नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या दिल्लीतील शाहीन बागमधील आंदोलनामुळे तेथील रस्ते बंद झाले होते. आज अखेर एक रस्ता खुला करण्यात आल्याने दोन महिन्यांपासून त्रासलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. फरिदाबाद आणि जेतपूरकडे जाणाऱ्या दोन रस्त्यांवरील बॅरिकेड्स पोलिसांनी हटविले आहेत. मात्र, आंदोलकांनी कालिंदीकुंजचा रस्ता अद्यापही बंद करून ठेवला आहे. दरम्यान पोलिसांनी अॅम्बुलन्ससाठी काही वेळ रस्ता खुला केल्याचा खुलासा केला.
शुक्रवारी सकाळी पोलिसांनी ओखला पक्षी विहारजवळील बॅरीकेड्स हटविले. यामुळे बदरपूरला जाणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या लोकांना मदनपूर खादर मार्गावरून जावे लागत होते. त्यांचा मोठा वळसा आता वाचणार आहे. तर फरीदाबादला जाण्यासाठी लोकांना डीएनडीद्वारे आश्रमवरून कित्येक किमी फिरून जावे लागत होते.
मदनपूर खादर रस्त्यावरून जाण्यासाठी 20 मिनिटे लागतात. मात्र, रस्ता बंद असल्याने त्यांना जाण्यासाठी अडीज तास लागत होते. आता रस्ता खुला केल्याने बदरपूर, जैतपूरला राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नोएडा पोलिसांना हा रस्ता बंद करण्याची आवश्यकता नव्हती. कारण आंदोलक या रस्त्यापासून खूप दूर अंतरावर बसलेले आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
मात्र, आंदोलकांमुळे शाहीन बागेहून कालिंदीकुंजला जाणारा रस्ता क्रमांक 13A बंदच आहे. यामुळे नोएडाच्या बाजुने 500 मीटर अंतरावर हा रस्ता बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी 13 डिसेंबरपासून आंदोलन सुरु आहे.