नवी दिल्ली : एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमात प्रवेशासाठी घेण्यात येणा-या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत (नीट) बसणा-या विद्यार्थ्यांसाठी यावर्षीपासून प्रश्नपत्रिकेचा एकच संच राहणार असल्याची माहिती केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डने (सीबीएसई) उच्च न्यायालयात दिली.संकल्प चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्तीद्वय अरुण मिश्रा आणि एफ. ए. नजीर यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. नीट परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांसाठी एकच प्रश्नपत्रिका असावी, अशी मागणी ट्रस्टने याचिकेत केली होती.सीबीएसईने न्यायालयात सांगितले की, पूर्वी विद्यार्थ्यांना हिंदी आणि इंग्रजीसह १० भाषांमध्ये ‘नीट’ परीक्षा देण्याची मुभा होती. यापूर्वीही न्यायालयाने वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रश्नपत्रिकांचे वेगवेगळे सेट तयार करण्याला ‘अतार्किक’ म्हटले होते. विद्यार्थ्यांचे प्रश्न वेगवेगळे असेल तर त्यांच्या दक्षतेचे मूल्यांकन करणे अत्यंत कठीण होईल, असेही न्यायालयाने म्हटले होते. सर्व प्रश्नपत्रिकेच्या कठीणतेचा स्तर समान असेल तर परीक्षेत एकरूपतेचा उद्देश पूर्ण होईल आणि प्रश्नपत्रिकेचे अनेक सेट असणे चुकीचे नाही, असे बोर्डाने मांडलेल्या मताला न्यायालयाने फेटाळले होते. सीबीएसईने न्यायालयाच्या सूचनांवर होकार दर्शवीत सध्याच्या शैक्षणिक सत्रापासून प्रश्नपत्रिकेचा एकच संच राहील आणि त्याचा अनुवाद वेगवेगळ्या भाषांमध्ये करण्यात येईल, असे सांगितले.
‘नीट’मध्ये प्रश्नपत्रिकेचा एकच संच, यावर्षीपासून अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 4:05 AM