एक मुलगा आयएएस अधिकारी आहे, दुसरा मुलगा मोठा व्यापारी आहे, तरीही एका वृद्ध हतबल बापावर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली आहे. उत्तर प्रदेशच्या आग्रा येथून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. आग्रा येथील पत्नी आणि मुलांच्या वागणुकीने व्यथित झालेल्या व्यक्तीने वृद्धाश्रम गाठलं. रामलाल वृद्धाश्रमातील लोकांनी चौकशी केली असता कळलं की वृद्धाचा एक मुलगा आयएएस आहे तर दुसरा मुलगा मोठा व्यापारी आहे.
वृद्धाश्रमात राहणाऱ्या लोकांना या व्यक्तीने आपली व्यथा सांगितली. घरात नोकरांसारखी वागणूक दिली जाते, असं ते म्हणाले. घरात त्याच्याशी कोणी नीट बोलत नाही आणि त्याचा सतत अपमान केला जातो. रोजच्या अपमानाने त्रस्त होऊन आश्रमात राहायला आलो असल्याचं सांगितलं. या व्यक्तीचं वय 78 असून ते बाळकेश्वर परिसरातील रहिवासी आहेत. VRS घेतल्यानंतर सेंट्रल बँकेत मॅनेजर पदावरून निवृत्त झाले.
आश्रमातील लोकांना सांगितले की, त्यांची कोट्यवधी रुपयांची हवेली आहे. सर्व काही करूनही त्यांना नोकरांसारखी वागणूक दिली जात आहे. कुटुंबातील सर्व सदस्य आपापल्या जगात वावरत असून त्यांच्याशी बोलायला कोणालाच वेळ नाही. ते म्हणाले की, माझा आयएएस मुलगा दुसऱ्या राज्यात काम करतो आणि त्याला वडिलांशी बोलायला वेळ नाही. लाखो रुपये घेऊन धाकटा मुलगा विभक्त झाला आहे. पत्नी मुलासोबत कमला नगर येथील कोठीमध्ये राहत असून पैसे घेतल्यानंतर लहान मुलगा वडिलांशी बोलत नाही.
पत्नीही बहुतेक वेळा मोबाईलमध्ये व्यस्त असते. ते थांबल्यावर सर्वजण त्यांचा अपमान करतात. यानंतर रामलाल वृद्धाश्रमाचे मालक शिवकुमार शर्मा यांनी फोन करून कुटुंबीयांना माहिती दिली. नातेवाईकांना ते आश्रमात आल्याची माहिती मिळताच 27 मे रोजी वृद्धाचे कुटुंबीय आश्रमात पोहोचले. लेखी करार करून म्हातार्याला सोबत घरी नेले. या घटनेची लोकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.