आई-वडिल आपलं सर्वस्व जीवन मुलांच्या भवितव्यासाठी खर्च करतात. बालपणापासून मुलांना चांगल शिक्षण देऊन मोठा अधिकारी बनविण्याचं स्वप्नही बाळगतात. त्यासाठी, कितीही कष्ट करायची माता-पित्यांची तयारी असते. कारण, आपल्या मुलांच्या भविष्यातच ते आपलं भविष्य पाहात असतात. मुलांचं यश हेच आपलं यश मानत असतात. पंजाबच्या मुख्तसर साहिब येथील एक महिला नशिबवान राहिली की, तिची मुले समाजात मानाचं स्थान कमवून आहेत. मात्र, वृद्धावस्थेच या महिलेच्या नशिबी नरकयातना आल्याने या मुलांच्या प्रतिष्ठेला काय किंमत ? असा प्रश्न विचारला जात आहे.
पीडित महिलेचा एक मुलगा सरकारी अधिकारी, दुसरा मुलगा स्थानिक राजकीय पक्षाचा पुढारी तर त्यांची नातही पीसीएस अधिकारी आहे. मात्र, नशिबानं एवढं सगळं देऊनही या महिलेला वृद्धपणी काहीच मिळाला नाही. कारण, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात घराबाहेर जीवन जगण्यास ही आजी मजबूर झाल्याचं दिसून आलं. तीन दिवसांपूर्वी 82 वर्षीय महिला बूडा गुज्जर रोडवरील मातीच्या उभारलेल्या भिंतीच्या छताखाली जीवन जगत असल्याचं दिसून आली. उन्हाचा जोर असतानाही ती महिला येथे राहण्यास हतबल झाली होती, तिच्या शरीरात किडे पडल्याचं पाहायला मिळालं, अंगावर कपडेही नव्हते. एकाने महिलेची ही दुरावस्था पाहिल्यानंतर समाजसेवी संस्थेला कळवले. त्यानंतर, पोलिसांच्या मदतीने या महिलेला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पीडित महिलेबाबत तिच्या मुलाला माहिती देण्यात आल्यानंतर त्याने तत्काळ रुग्णालयात धाव घेतली. तेथून, एका खासगी रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, खासगी रुग्णालयात महिलेनं अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी एएसआय दिलबाग सिंह यांनी सांगितले की, वृद्ध महिला सोढियों का आरा कोटली रोड येथील रहिवाशी आहे. या महिलेच्या मुलाने एका व्यक्तीस महिलेची देखभाल करण्यासाठी ठेवले होते. त्यासाठी, त्यास दरमहा पैसे देण्यात येत होते. मात्र, त्या व्यक्तीने काळजी घेतली नाही. तर महिलेच्या मुलांनीही तिची कधी विचारपूस केली नाही. त्यामुळे, पीडित महिलेवर ही वेळ आली होती.
दरम्यान, याप्रकरणी जिल्हा उपायुक्तांनी महिलेच्या मृत्युप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. एसडीएम वीरपाल कौर हे घटनेचा संपूर्ण तपास करणार आहेत.