Ayodhya Ram Mandir News: अयोध्येत राम मंदिराचे काम वेगाने सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी केली जात आहे. मात्र, राम मंदिर परिसरातून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने पिवळ्या रंगाचे हेल्मेट घातले होते आणि या हेल्मेटला कॅमेरा लावण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिर परिसरात गेट क्रमांक १० वर तैनात असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने दुचाकीवर फिरणाऱ्या दोन जणांना हटकले. चौकशी केल्यानंतर या दोघांना राम जन्मभूमी पोलिसांच्या हवाली करण्यात आले. या दोघांची पोलिसांनी तसेच विविध गुप्तचर यंत्रणांनी कसून चौकशी केली.
पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा चौकशी करत आहेत
छत्तीसगडमधील रहिवासी असलेल्या भानू पटेल हा यलो झोनमध्ये दुचाकीवरून फिरत होता. त्याच्या हेल्मेटवर कॅमेराही लावण्यात आला होता. हे पाहून रामजन्मभूमीच्या गेट क्रमांक १० वर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी थांबवले आणि त्याची झडती घेतल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अनेक गुप्तचर यंत्रणांनी रामजन्मभूमी पोलीस स्थानकात त्यांची चौकशी केली. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पटेल हा इंडिया मॅप कंपनीचा कर्मचारी आहे. पटेल सर्वेक्षणाच्या कामासाठी आला होता. अद्याप कंपनीला यासाठी परवानगी मिळालेली नाही. सध्या पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा चौकशी करत आहेत.
दरम्यान, अयोध्येचे एसपी गौतम यांनी सांगितले की, पकडण्यात आलेली व्यक्ती इंडिया मॅप कंपनीचा कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. सर्वेक्षण करण्यासाठी कंपनीने जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला आहे, मात्र अद्याप परवानगी मिळालेली नाही. असे असतानाही सदर कामगार सर्वेक्षण करत होता. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ती व्यक्ती कंपनीची कर्मचारी असल्यासंदर्भात दुजोरा दिला. आधारकार्ड आणि इतर ओळखपत्रांच्या आधारे त्याचा पत्ता इत्यादींची पडताळणी करण्यात आली. अद्याप चौकशी सुरू असल्याचे गौतम यांनी सांगितले.