श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी (3 जून) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शोपियान जिल्ह्यातील मोलू चित्रगम परिसरात सोमवारी चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्याच्या द्रागड सुगान भागात 31 मे रोजी दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलांची चकमक सुरु होती. यामध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. शोधमोहीम सुरू असताना सुरक्षा दलावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यावेळी जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरातील कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले होते. तर जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारी (29 मे) पहाटेपासून चकमक सुरू होती. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. रमजानचा महिना सुरू असल्याने दहशतवाद्यांनी तसेच लष्करानेही कारवाया करू नयेत असे आवाहन जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले होते.
लष्कराला मोठं यश! मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचा खात्मा
काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा करण्यात सुरक्षा यंत्रणांना मोठं यश आलं होतं. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात झालेल्या चकमकीत मुसाचा खात्मा करण्यात आला. जम्मू काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण असून सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामा येथील त्राल परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर गुरुवारी (23 मे) शोधमोहीम राबवण्यात आली होती. यादरम्यान झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाला झाकीर मुसाचा खात्मा करण्यात यश आले. शुक्रवारी सकाळी मुसाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तसेच त्याच्यासोबत कमांडर अन्सार याचा देखील खात्मा करण्यात आला होता.