श्रीनगर:जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील हैदरपोरा भागात सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार झाल्यची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरपोलिसांनी सांगितले की, कारवाई अजूनही सुरू आहे. याआधी रविवारी श्रीनगरच्या नवाकडल भागात दहशतवाद्यांनी पोलीस दलावर गोळीबार केला होता ज्यात एक पोलीस जखमी झाला होता. नवाकडलच्या जमालता भागात संध्याकाळी दहशतवाद्यांनी पोलिस दलावर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यात एक पोलिस अधिकारी जखमी झाला होता. जखमी पोलिस कर्मचाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, राज्यातील टार्गेट किलिंगच्या घटना पाहता सुरक्षा यंत्रणांनीही रणनीती बदलली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लपलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी एक यादी तयार केली आहे. या यादीनुसार, राज्यात 97 सक्रिय दहशतवादी लपल्याची माहिती आहे. रिपोर्टनुसार, या 97 दहशतवाद्यांपैकी 24 हिजबुल मुजाहिद्दीन, 52 लष्कर, 11 अल बद्र आणि 9 दहशतवादीजैश-ए-मोहम्मद संघटनेचे आहेत.
बीएसएफला दिलेली रणनीती यशस्वी करण्याची जबाबदारी
आता दहशतवादाविरुद्धची ही बदललेली रणनीती यशस्वी करण्याची जबाबदारी बीएसएफकडे देण्यात आली आहे. 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा बीएसएफ दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी मैदानात उतरले आहे. आता काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा केला जाण्याची खात्री आहे. काश्मीरमधील अंतर्गत सुरक्षा आणि दहशतवादविरोधी कारवाईत बीएसएफचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात बीएसएफच्या दोन डझन कंपन्या काश्मीरमध्ये तैनात केल्या जात आहेत.
प्रत्येक बीएसएफ कंपनीत साधारणपणे 90 ते 100 अधिकारी आणि जवान असतात. श्रीनगर, पुलवामा, शोपियान, अनंतनाग, गांदरबल, कुलगाम आणि बारामुल्ला येथे बीएसएफला तैनात करण्यात आलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये बीएसएफची तैनाती महत्त्वाची आहे, कारण बीएसएफचा दहशतवाद्यांविरोधातील कारवाईचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. शिवाय बीएसएफला काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाईचा जुना अनुभवही आहे.
आतापर्यंत 117 दहशतवादी मारले गेले
यावर्षी 1 जानेवारी 2021 ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत 117 दहशतवादी मारले गेले. यादरम्यान 254 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. दहशतवाद्यांकडून 105 एके-47, 126 पिस्तूल आणि 276 हँडग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. ऑक्टोबर महिन्यातही सुरक्षा दलांनी 20 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.