चंदीगड : एकेकाळी अत्यंत शक्तिशाली आणि लोकप्रिय अधिकारी म्हणून गाजलेले १९८२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा पंजाबचे माजी पोलीस महासंचालक सुमेधसिंग सैनी यांच्याविरुद्ध एका जुन्या खटल्यात शनिवारी मोहालीच्या स्थानिक न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले असून कधीकाळी ‘मोस्ट पॉवरफूल’ असलेले सैनी आता ‘मोस्ट वॉन्टेड’ बनले आहेत. आपली झेड प्लस सुरक्षा सोडून ते फरार झाले आहेत.पंजाबातील दहशतवादाच्या काळात कठोर पोलीस अधिकारी म्हणून सैनी यांची ख्याती होती. २९ वर्षांपूर्वीच्या एका खून खटल्यात ते आरोपी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पळण्याची वेळ आली आहे.१९९१ मधील हे प्रकरण आहे. सैनी हे तेव्हा चंदीगडचे एसएसपी होते. कनिष्ठ अभियंता बलवंतसिंगमुलतानी याचे अपहरण करणे आणि छळ करून त्याची हत्या करणे आणि मृतदेह गायब करणे, असे आरोप त्यांच्यावर आहेत. बलवंतसिंग मुलतानी हा अभियंता तेव्हाच्या एका सेवारत आयएएस अधिकाऱ्याचा मुलगा होता.काय आहे प्रकरण?१९९१ मध्ये सैनी यांच्यावर अतिरेकी हल्ला झाला होता. त्यात तीन पोलीस ठार तर सैनी हे जखमी झाले होते. कुख्यात अतिरेकी देविंदरपालसिंग भुल्लर याने हा हल्ला घडविल्याचा संशय होता. मुलतानी यास भुल्लरचा ठावठिकाणा माहीत आहे, असा सैनी यांचा विश्वास होता. त्यावरून त्यांनी मुलतानीचे अपहरण करून ठार केल्याचा आरोप आहे. भुल्लर हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.सैनी यांना पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन नाकारला होता. शनिवारी मोहालीच्या सत्र न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट बजावतानाच त्यांना २५ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले. सहा पोलीस पथके सैनी यांचा शोध घेत आहेत.
एकेकाळचा ‘मोस्ट पॉवरफूल’ अधिकारी बनला मोस्ट वॉन्टेड, सुमेधसिंग सैनी फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 2:27 AM