भारतीय हवाई दलाचा (Indian Air Force) आज ९१ वा स्थापना दिवस आहे. या निमित्ताने भारतीय हवाई दलाच्या नवीन ध्वजाचे अनावरण करण्यात आले. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्या हस्ते नवीन ध्वजाचे अनावरण करण्यात आले. जवळपास ७२ वर्षांनंतर भारतीय हवाई दलाच्या ध्वजात बदल करण्यात आला आहे.
दरम्यान, भारतीय हवाई दलाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हवाई दलाला शुभेच्छा दिल्या आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये आज भारतीय हवाई दलाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने एअर शोचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारतीय हवाई दलाचे एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्या हस्ते नवीन ध्वजाचे अनावरण करण्यात आले.
नवीन ध्वजावर उजव्या कोपर्यात भारतीय हवाई दलाचे चिन्ह असून त्यामध्ये त्यात हिमालयन गरुड आणि अशोक स्तंभाची भर पडली आहे. अशा नव्या रुपात भारतीय हवाई दलाचा नवा ध्वज दिमाखात फडकवण्यात आला. याचबरोबर, येथील बमरौली एअरफोर्स स्टेशनवर मेगा एअर शोचे आयोजन करण्यात आले. तसेच, यावेळी भारतीय हवाई दलाच्या परेडमध्ये पहिल्यांदाच महिलांच्या तुकडीनेही सहभाग घेतला.
एवढेच नाही तर यावेळी या परेडची कमान महिला अधिकारी ग्रुप कॅप्टन शालिजा धामी यांच्याकडे होती. याशिवाय, या भारतीय हवाई दलाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाची थीम 'IAF– Airpower Beyond Boundaries'वर अधारित आहे. दरम्यान, ८ ऑक्टोबरला 'भारतीय हवाई दल' दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय हवाई दल हे जगातील सर्वात शक्तीशाली हवाई दलांपैकी एक आहे. भारतीय हवाई दलाची स्थापना ८ ऑक्टोबर १९३२ रोजी ब्रिटिशांनी रॉयल भारतीय हवाई दल म्हणून केली होती. सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे हवाई दल प्रमुख होते.