जेरुसलेम, दि. 4 - इस्रायलमधील नैसर्गिक वायूंच्या साठ्यांवर भारतातल्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) बोली लावण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्रायल दौऱ्यानंतर हा सर्वात मोठा करार ठरण्याची शक्यता आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे स्पष्ट केलं आहे.अनेकदा इस्रायलमधील नैसर्गिक वायुसाठ्यांच्या बोलीकडे आंतरराष्ट्रीय तेल कंपन्या पाठ फिरवत असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. नैसर्गिक वायू आणि तेल क्षेत्रांत अरब राष्ट्रांचं वर्चस्व आहे. अरब राष्ट्रांना नाराज न करण्याच्या उद्देशानं ब-याच आंतरराष्ट्रीय तेल कंपन्यांनी इस्रायलसोबत करार करण्याचं टाळलं आहे. परंतु भारताचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विधानानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. तसेच त्यांच्या या वक्तव्याला अनपेक्षितरीत्या महत्त्वही प्राप्त झालं आहे. इस्रायलच्या समुद्राच्या तळाशी असलेल्या नैसर्गिक वायूसाठ्यांसाठी ओएनजीसी बोली लावणार आहे, असे विधान त्यांनी केले होते.भारताच्या शिष्टमंडळाने इस्रायलमधील नैसर्गिक वायुसाठ्यांची पाहणी केली असून, लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचा मानसही बोलून दाखवला आहे. इस्रायलच्या भूमध्य समुद्रात मोठ्या प्रमाणात है नैसर्गिक वायूंचे अनेक साठे आहेत. लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी भारताच्या पेट्रोलियम मंत्रालयानं पाठवलेल्या शिष्टमंडळाने इस्रायलमधील अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चासुद्धा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलैमध्ये इस्रायलचा दौरा केल्यानंतर इस्रायलनंही भारताच्या विकासासाठी हातभार लावण्याचे सूतोवाच केले होते. संरक्षण क्षेत्रात इस्रायल आणि भारत या दोन्ही देशांची द्विपक्षीय संबंध फार चांगले आहेत. त्यामुळेच तंत्रज्ञान, तेल, ऊर्जा आदी क्षेत्रांतील व्यापारी संबंध सुधारण्यासाठीसुद्धा दोन्ही देश प्रयत्नशील आहेत. ओएनजीसीला इस्रायलमधील नैसर्गिक वायुसाठा मिळाल्यास दोन्ही देशांमध्ये हा महत्त्वपूर्ण करार ठरू शकतो. तसेच भारतालाही याचा मोठा फायदा मिळणार आहे. इस्रायल या देशासोबतच लेबनन येथील नैसर्गिक वायूसाठे मिळवण्याचा भारत प्रयत्न करत असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
इस्रायलमधल्या नैसर्गिक वायुसाठ्यांवर ओएनजीसी बोली लावण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2017 8:34 PM