लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: कांद्याबाबत सरकारची धरसोड भूमिका, निर्यातीवर लादलेले ४० टक्के किमान निर्यात मूल्य आदी कारणांनी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरातून समुद्रमार्गे कांद्याची निर्यात ६० टक्क्यांनी घटली आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात या बंदरातून ८९,१७४.७६० मेट्रिक टन कांदा विविध देशांमध्ये भारतातून रवाना झाला होता. या वर्षाच्या जुलै महिन्यात केवळ २१,७६५.३२२ मेट्रिक टन कांदा समुद्रमार्गे विदेशात पोहोचला आहे. या एकाच महिन्यात तब्बल ६७,४०९.४०० मे. टन कांद्याची घट दिसून आली. ऑगस्ट महिन्यातही वेगळी स्थिती नाही.
देशाची कांदा निर्यात गतवर्षात १३ टक्क्यांनी घटली असल्याचे आकडे जून महिन्यात समोर आले होते. त्यानंतरही निर्यातीचा आलेख सातत्याने घसरत असल्याची बाब प्रकर्षाने जाणवते. वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये कांदा निर्यातीतून ३,८७४ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले होते. विदेशात जाणारे कांद्याचे कंटेनर घटल्याने बंदराच्या उत्पन्नातही घट झाली आहे.
बांगलादेशकडील निर्यात सुरळीत
- गेल्या चार ते पाच दिवसांपासून बांगलादेशला ट्रकद्वारे कांदा निर्यात सुरळीत सुरू झाली असल्याची माहिती प्रमुख निर्यातदारांनी दिली. - बांगलादेशला राजकीय अराजकता माजल्यावर सीमा सील असल्याने दाेघा देशांच्या सीमेवर कांद्याचे ट्रक अडकून पडले होते.- ३६ तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली अन् दोन दिवसांनी पुन्हा काही काळ ट्रक थांबले होते.- मात्र, आता चार-पाच दिवसांपासून भारतातून दररोज ८० ट्रक कांदा भरून बांगलादेशला पोहोचत आहे.- हा एक दिलासा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला आहे. दुसरीकडे समुद्रीमार्गे निर्यात मात्र घटली आहे.