नवी दिल्ली - दरवर्षी एकदा दरी कांदा सर्वसामान्यांना रडवतोच. देशात काही दिवस कांद्याचे भाव गगनाला भिडलेले असतात, तर काही वेळा कांद्याला अगदी मातीमोल भाव असतो. अशा वेळी शेतकऱ्यांना कष्टाने पिकवलेला कांदा अत्यंत कमी किमतीत विकावा लागतो. सध्या तुम्ही बाजारात कांदा खरेदी करायला गेला, तर 25 ते 30 रुपये प्रतिकिलो दराने कांदा मिळेल. कांदा थोडा खराब असेल तर तो किमान 10 ते 15 रुपये प्रति किलो दराने मिळेल. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बळीराजा अत्यंत मेटाकुटीला आला असताना त्याची जीवघेणी थट्टा करण्यात आली आहे.
तब्बल 100 किलो कांद्याच्या बदल्यात शेतकऱ्याला फक्त 50 रुपये दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. व्यापाऱ्याने दिलेली पावती सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील मंदसौर येथील बाजार समितीत एका शेतकऱ्याला केवळ 50 रुपयांत 100 किलो कांदा विकावा लागला आहे. एका व्यापाऱ्याने शेतकऱ्याकडून 50 रुपयांत 100 किलो कांदा विकत घेतला आहे. प्रतिकिलो प्रमाणे याचा हिशोब केला तर शेतकऱ्याला केवळ 50 पैसे प्रतिकिलो दराने आपला कांदा विकावा लागला आहे.
व्यापाऱ्याकडून दिलेली पावती सोशल मीडियावर व्हायरल
कांद्याच्या व्यवहाराची व्यापाऱ्याकडून दिलेली पावती सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं आहे. पण संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणीही वाली उरला नाही.बाजार समितीत शेतकऱ्यांची अशाच प्रकारे लूट होणार असेल तर शेतकऱ्यांनी शेती कशी करावी? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणंही अत्यंत कठीण झालं आहे.
शेतकऱ्याने जाळला होता शेकडो किलो लसूण
काही दिवसांपूर्वी मंदसौर येथील बाजार समितीत एका शेतकऱ्याने शेकडो किलो लसूण जाळला होता. संबंधित शेतकरी लसूण घेऊन जेव्हा बाजार समितीत आला, तेव्हा लसणाला योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने लसणाच्या गोणीवर पेट्रोल टाकून सगळा माल जाळून टाकला होता. आमचा उत्पादन खर्च देखील निघत नसल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्याने केला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.