यंदाच्या उत्सवी काळात कांदा देखील रडवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. खरीप हंगामाला झालेला उशीर आणि अन्य कारणांमुळे ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये कांद्याच्या किंमती वाढण्याची (Onion prices hike) शक्यता आहे. क्रिसिलच्या एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. (Onion prices likely to get in this festive season: Crisil)
रिपोर्टनुसार यंदा कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या भागांमध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाची कमतरता होती. यामुळे कांद्याच्या लागवडीला उशीर झाला आहे. पीटीआयनुसार भारतात कांद्याचा खप हा दर महिन्याला सरासरी 13 लाख टन असतो. खरीपाच्या हंगामात झालेल्या विलंबामुळे कांद्याचा साठा हा फार काळ पुरणार नाही. तसेच तौक्ते चक्रीवादळ आल्याने देखील उत्पादनावर परिणाम झाला आहे. यामुळे अन्य काही कारणांमुळे महागाई वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तीन वर्षांपूर्वीपेक्षा दुप्पट दरजर 2018 ची तुलना केली तर यंदा कांद्याच्या दरात 100 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. म्हणजेच हे दर 2018 पेक्षा दुप्पट असू शकतात. यंदा खरीप हंगामात कांद्याची घाऊक किंमत 30 रुपये पार करू शकते. गेल्या वर्षी हा दर थोडा कमी होता. 2018 हे वर्ष कांद्याच्या दरांसाठी सामान्य वर्ष मानले जाते. यानंतर कांद्याचा दरात सतत वृद्धी दिसली. 2020 मध्ये देखील कांद्याचे दर हे 2018 च्या तुलनेत दुप्पट झाले होते.
ऑगस्ट महिन्यात पावसाच्या प्रमाणात 9 टक्क्यांची घट झाली. क्रिसिलनुसार कांद्याच्या उत्पादनात यंदा 3 टक्क्यांची वाढ होऊ शकते. ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे उत्पादन घेतले जाईल, त्या आधीच कांद्याच्या दरात वाढ होईल.