नवी दिल्ली : दिल्लीत दिवसेंदिवस कांद्याचा दर वाढतच असून त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने अतिरिक्त साठ्यातील कांद्याची नागरी पुरवठा विभागाच्या मदतीने रेशन दुकानांत माफक दराने विक्री करण्याच्या सूचना दिल्ली सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार प्रतिकिलो कांद्याचा दर २३.९० रुपये असणार आहे.
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार दिल्ली आणि आसपासच्या परिसरात कांद्याचे भाव ३९ ते ४० रुपये किलो आहेत. काही विक्रेते कांद्याच्या गुणवत्तेनुसार तो ५० रुपये किलो दरानेही विकतात. सरकारने सूचना केल्यानंतर भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड), भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ (एनसीसीएफ) आणि मदर डेअरी यांच्याकडील अतिरिक्त साठ्यातील कांदा घेऊन तो रेशन दुकानांकडे देण्यात येणार आहे.
मदर डेअरीकडून काही दुकानांमध्ये कांदा २३.९० रुपये किलो दराने विकला जात आहे. ग्राहकसंबंधी मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्राकडील अतिरिक्त साठ्यातील कांदा ग्राहक विभाग आणि रेशन दुकानांच्या माध्यमांतून विकण्याचा राज्य सरकारला आग्रह करण्यात आला आहे. राज्याकडून कमाल २३.९० रुपये प्रतिकिलो दराने कांदा विकला जात आहे. केंद्राकडील साठ्यातील कांदा १५ ते १६ रुपये किलो दराने दिला जात आहे.
दिल्लीत दररोज ३५० टन कांद्याची आवश्यकता आहे. तर एनसीआरला दररोज ६५० टन कांद्याची आवश्यकता असते. केंद्राकडून या वर्षी ५६ हजार टन कांदा साठवण्यात आला आहे. त्यातील आतापर्यंत १० हजार ते १२ हजार टन कांद्याची नाफेड, एनसीसीएफ आणि मदर डेअरीकडून विक्री करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील उत्पादन घटल्याने महाग
- खरीप कांद्याचे उत्पादन यंदा कमी झाल्यामुळे कांदा महागला आहे. त्याचप्रमाणे प्रमुख उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादनातही दहा टक्क्यांनी घट झाल्यामुळे कांदा महागला आहे.
- दरवर्षी महाराष्ट्रातून दिल्लीला मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात होते.