नवी दिल्ली : भारताने कांद्याच्या निर्यातीवर घातलेल्या बंदीचा परिणाम बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याच स्वयंपाकघरात झाल्याचे दिसते. कारण त्यांनी थट्टेने का असेना त्यांच्या स्वयंपाक्याला स्वयंपाकात कांद्याचा वापर करू नको, असे सांगितले आहे.येथे त्या शुक्रवारी भारत-बांगलादेश बिझनेस फोरममध्ये बोलत होत्या.त्या गमतीने म्हणाल्या, भारताने असे निर्णय (निर्यातीचा) घेण्याआधी पूर्वसूचना द्यावी. कांद्याची निर्यात थांबविण्याचा भारताच्या अचानक झालेल्या निर्णयाने माझ्या देशवासीयांना काहीशा अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ‘तुम्ही कांद्याची निर्यात का थांबवली, मला माहिती नाही. मग मी काय केले, तर माझ्या स्वयंपाक्याला कांद्याचा वापर करू नको’, असे सांगितल्याचे त्या म्हणाल्या. अशा निर्णर्यांची पूर्वकल्पना असेल, तर उपयोग होतो. अचानक तुम्ही निर्यात थांबवली आणि आम्हाला अडचणी येऊ लागल्या. भविष्यात असे काही निर्णय घेणार असाल, तर पूर्वकल्पना दिल्यास आम्हाला मदत होईल, असे हसीना यांनी म्हटले.भारताने देशात कांद्याच्या वाढत्या किमतीला आवरण्यासाठी व साठा वाढावा म्हणून निर्यातीवर २९ सप्टेंबर रोजी बंदी घातली. केंद्र सरकारने कांद्याचा साठा घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी किती ठेवावा, यावरही मर्यादा घातली. बांगलादेश आणि भारत यांच्यातील वाढता व्यापार आणि गुंतवणूक यावर बोलताना हसीना म्हणाल्या की, ‘बांगलादेशात वेगवेगळ्या क्षेत्रांत भारतीय व्यावसायिकांना मोठी संधी उपलब्ध आहे.
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या स्वयंपाकघरात कांदाटंचाई, भारताच्या निर्यातबंदीचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 4:12 AM