ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - दलालांकडून होणारा रेल्वे तिकीटांचा काळाबाजार रोखण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाने ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी एक नवा नियम आणला आहे. या नव्या नियमानुसार, आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरील एका युजर आयडीवरून एका महिन्यात जास्तीत जास्त ६ तिकीटे बूक करता येणार आहेत. १५ फेब्रुवारीपासून हा नवा नियम लागू होणार आहे. तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी हा नियम आणला असला तरी बाहेरगावी राहणारे व दर आठवड्याच्या शेवटी घरी परतणारे प्रवासी यामुळे भरडले जाऊ शकतात, कारण त्यांचा महिन्यातला प्रवास हा सहा पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, एकच व्यक्ती वेगवेगळे युजर आयडी उघडू शकते, आणि सहापेक्षा जास्त तिकिटे बूक करू शकते, याला कसा आळा घालता येईल याबद्दल अद्याप तरी रेल्वेने त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात माहिती दिलेली नाही.
सध्या आयआरसीटीसीच्याया एका आयडीवरून एका महिन्यात सहापेक्षा जास्त तिकीटे बूक करता येतात, मात्र रेल्वे दलाल याचाच फायदा घेताना दिसत असून सर्वसामान्य प्रवाशांचे नुकसान होते, असे रेल्वेचे म्हणणे आहे. हेच लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असून त्यामुळे दलालांना चाप बसेल व सर्वसामान्य प्रवाशांना फायदा होईल, असे एका रेल्वे अधिका-यांने सांगितले. मात्र अनेक प्रवाशांना हा नवा नियम मान्य नसून तो त्रासदायक वाटत आहे. जे प्रवासी गरजू आहेत किंवा कामानिमित्त शहराबाहेर राहतात आणि वीकेंडला घरी येतात, त्यांच्यासाठी हा नियम नवी डोकेदुखी ठरू शकतो, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.
दलालांना रोखण्यासाठी आयआरसीटीसीने आत्तापर्यंत अनेक उपाय योजले असून त्यानुसार बूकिंग सुरू झाल्यावर त्यांना पहिला अर्धा तास बूकिंग करता येत नाही. तसेच सकाळी ८ ते ८.३० पर्यंत जनरल बूकिंग, १० ते १०.३० एसी व ११ ते ११.३० ऑन-एसी बूकिंग केले जाते.
रेल्वे बूकिंगसाठी काही नवे नियम
- अॅडव्हान्स तिकीट बूकिंगसाठी एका दिवशी सकाळी ८ ते १० या वेळेत (अॅडव्हान्स रिझर्व्हेशन पीरियड, तत्काळ बुकिंग) एका यूजर आयडीवरुन केवळ दोन ऑनलाईन तिकीटे बूक करता येतील.
- तर सकाळी १० ते १२ दरम्यान (तत्काळ बुकिंग) एका यूजर आयडीवरुन दोन तिकीटेच बूक करता येतील.
- क्विक बुकिंगचा पर्याय सकाळी ८ ते १२ दरम्यान बंद करण्यात येणार आहे.