ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 10 - कोंबडयाच्या झुंजी आयोजित करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. हैदराबादमध्ये आयोजक मात्र सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून बिनदिक्कतपणे OLX वेबसाईटवरुन फायटर कोंबडयांची विक्री करत आहेत.
वस्तूच्या खरेदी-विक्रीची माहिती देणा-या OLX वेबसाईटवरुन फायटर कोंबडयांची विक्री केली जात आहे. OLX वर विक्रीसाठी ठेवल्या जाणा-या फायटर कोंबडयांची किंमत 5 ते 25 हजार आहे. विजयवाडा, कडापा, विशाखापट्टणम, काकिनाडा अशा भागातून मोठया प्रमाणावर फायटर कोंबडया विकल्या जात आहेत. फेसबुकवरुनही फायटर कोंबडे विक्रीची जाहीरात केली जातेय.
काय आहे परंपरा
आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी भागात मकरसंक्रातीला कोंबडयांच्या झुंजी आयोजित करण्याची परंपरा आहे. या झुंजीमध्ये पैसा लावला जातो. अशा झुंजींमधून दरवर्षी कोटयावधी रुपयांचा व्यवहार होतो.
पैसा कमावण्यासाठी अशा झुंजी लढवल्या जातात. झुंज संपते तेव्हा एका कोंबडयाचा मृत्यू होतो किंवा गंभीर जखमी होतो.काही ठिकाणी रक्ताची लढाई लढवण्यासाठी कोंबडयांच्या पायाला चाकू बांधला जातो.