एस. के. गुप्ता नवी दिल्ली : नव्या वर्षात देशात सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लागू केले जाईल. केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य करण्यासाठी भारतीय मानक ब्युरोला (बीआयएस) जनजागृती मोहीम राबवणे व सराफांना (ज्वेलर्स) आॅनलाइन रजिस्ट्रेशन देण्यासाठी आदेश दिले गेले आहेत. बीआयएसकडून ज्वेलर्सला आॅनलाईन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट देण्याच्या दिशेने सॉफ्टवेअरवर काम केले जात आहे.
केंद्रीय ग्राहक कामकाज, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले की, यामुळे सोन्याचे दागिने किती शुद्ध आणि त्यात किती खोट आहे हे त्यावरील हॉलमार्कवरून समजेल. यामुळे दागिने उद्योगावर मोठा प्रभाव पडेल. परंतु, ग्राहकांना याचा जास्त लाभ होईल. पासवान म्हणाले की, दागिन्यांवरील हॉलमार्किंगचा प्रस्ताव वाणिज्य मंत्रालयाने आधीच डब्ल्यूटीओला पाठवला आहे. डब्ल्यूटीओ येत्या डिसेंबरमध्ये आपल्या संकेतस्थळावर तो अधिसूचित करील.
बीआयएसचा एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला की, दागिन्यांवर हॉलमार्किंग एक जानेवारीपासून लागू केले जाईल. नव्या नियमांनुसार सोन्याच्या दागिन्यांचे तीन वर्ग असतील. २२, १८ व १४ कॅरेट. सोन्याची शुद्धतेच्या आधारे हॉलमार्किंग केली जाईल. सध्या हॉलमार्किंग होत नसल्यामुळे बाजारात नकली सोन्याचीही विक्री होते. दागिन्यांवर हॉलमार्किंग असल्यामुळे ग्राहकालाही समाधान मिळेल आणि खरेदी करणाऱ्याला दुकानदाराबद्दल विश्वास वाटेल की जो दागिना आपण खरेदी करीत आहोत त्याची शुद्धता किती आहे व त्यासाठी आपण किती पैसे मोजत आहोत.हॉलमार्किंगची तयारीबीआयएसने ८०० हॉलमार्किंग केंद्र बनवले आहेत. त्यांच्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. त्यामुळे दागिन्यांवर हॉलमार्किंगबाबत काहीही गडबड होणार नाही. ज्वेलर्ससाठी हॉलमार्किंग नोंदणी शुल्क (रजिस्ट्रेशन फी) २५ हजार रूपये आहे. ती १० ते १५ हजार रूपये कपात करण्याची तयारी आहे. बीआयएस, नॅशनल टेस्टिंग हाऊस आणि लीगल मेट्रोलॉजीला त्यांच्यात उत्तम समन्वय ठेवण्यास सांगण्यात आले आहे म्हणजे कोणत्याही पायरीवर काम थांबू नये.