श्रीहरिकोटा - भारताची दुसरी चांद्र मोहीम असलेल्या चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाची तयारी सध्या जोरात सुरू आहे. चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी इस्रोने कंबर कसली आहे. 14 आणि 15 जुलैदरम्यान रात्री दोन वाजता चांद्रयान -2 चे प्रक्षेपण होणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण सर्वसामान्यांना पाहता यावे यासाठी इस्रोने खास व्यवस्था केले आहे. ज्यांना चांद्रयान-2 चे थेट प्रक्षेपण पाहायचे आहे, अशा सर्वसामान्य नागरिकांसाठी ऑनलाइन नोंदणीची सोय इस्रोने केली असून, आज मध्यरात्रीपासून इस्रोच्या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येणार आहे. सध्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रामध्ये चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाच्या तयारीवर अंतिम हात फिरवण्यात येत आहे. मंगळवारी चांद्रयान-2 ची रेडिओ फ्रिक्वेंसी तपासण्यात आली. तसेच इक्विमेंट-बे कॅमेराही लावण्यात आला. तसेच सर्व पेलोड्सच्या असेंब्लिंगचीही तपासणी करण्यात आली. 14 जून रोजी यू. आर. राव सॅटेलाइट सेंटर येथून चांद्रयान-2 चे ऑर्बिटर श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात पाठवण्याता आले होते. हे ऑर्बिटर 15 जून रोजी श्रीहरिकोटा येथील लाँच पोर्टवर पोहोचले होते.
चांद्रयान-2 चं थेट प्रक्षेपण पाहायचं आहे, मग इथे करा ऑनलाइन नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 10:38 AM