छत्तीसगढमधील ऑनलाइन सट्टा एप महादेव बुकचा मास्टरमाइंड सौरभ चंद्राकर यांचं लग्न होत आहे. तो मलेशियात त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत लग्नबंधनात अडकत असल्याचे समजते. या लग्नसोहळ्यातील साखरपुड्यात आपल्या प्रेमिकाच्या हातात तो तब्बल ३५ कोटी रुपयांची अंगठी घालणार आहे. विशेष म्हणजे १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन दिवशी दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत. या लग्नसोहळ्यासाठी दुर्ग जिल्ह्यातून जवळपास ३०० जण मलेशियाला जाणार आहेत.
सट्टाबाज बुकी सौरभ चंद्राकरच्या या लग्नसोहळ्यावर पोलिसांची करडी नजर आहे. कारण, सौरभ चंद्राकर हा दुबईत बसून देशभरात अवैध सट्टा व्यवसाय करतो. पोलिसांनी त्याला लुटआऊट नोटीसही जारी केली आहे. सौरभ ज्या मुलीसोबत लग्न करत आहे, ती मुलगी दुर्ग जिल्ह्यातील असून त्याची शाळेतील मैत्रीण आहे. दुर्गमध्येही अनेकांना या लग्नाचं निमंत्रण पत्रिकेच्या माध्यमातून पाठवण्यात आलं आहे. साखरपुडा आणि लग्नसोहळा मोठ्या थाटा-माटात होणार असून त्यासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.
सट्टाकिंगच्या या लग्नसोहळ्याला जवळपास ३०० लोकं जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामध्ये, शहरातील उद्योगपती, ट्रान्सपोर्टर, मोठे व्यापारी आणि पॅनेल चालवणारे लोकंही आहेत. विशेष म्हणजे काही लोकांना गोपनीय पद्धतीने लग्नाचे आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळेच, या लग्नास जाणाऱ्या लोकांवर पोलिसांचे विशेष लक्ष आहे.