वाराणसी - पंतप्रदान नरेंद्र मोदी हे वाराणसी येथून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. वाराणसीमध्ये नरेंद्र मोदींविरोधात कुठल्याही राजकीय पक्षाने मोठ्या नेत्याला मैदानात उतरवलेले नाही. मात्र या मतदारसंघातून मोदींविरोधात मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. पैकी 71 अर्ज निवडणूक आयोगाने बाद ठरवले. तर पाच जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे मोदींविरोधात आता केवळ 25 प्रतिस्पर्धी मैदानात उरले आहेत. वाराणसी लोकसभा मतदारसंघात शेवटच्या टप्प्यामध्ये 19 मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, येथून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज श्याम नंदन (जनता पार्टी), अर्जुन राम शंकर (जनसंघर्ष विराट पार्टी) राजेंद्र गांधी (अपक्ष), राजकुमार सोनी (अपक्ष) आणि संजय विश्वकर्मा (कांशीराम बहुजन दल) यांनी आपापला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता वाराणसी लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकूण 26 उमेदवार मैदानात उरले आहेत. वाराणसी येथून निवडणूक लढवत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. तर सपा-बसपा आघाडीने काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे माजी उपसभापती श्यामलाल यादव यांची सून शालिनी यादव यांना समाजवादी पक्षाकडून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीने बीएसएफमधील बरखास्त जवान तेज बहादूर यांना आपला उमेदवार बनवले होते. मात्र तेज बहादूर यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळल्याने शालिनी यादव पुन्हा एकदा महाआघाडीच्या उमेदवार बनल्या आहेत. आता वाराणसी येथे मोदींच्या विरोधात 25 उमेदवार मैदानात असले तरी मुख्य लढत ही नरेंद्र मोदी, काँग्रेसचे उमेदवार अजय राय आणि महाआघाडीचे उमेदवार शालिनी यादव यांच्यामध्येच होणार आहे.
वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात आता उरले केवळ 25 प्रतिस्पर्धी, 5 जणांचे अर्ज मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 7:28 PM