ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - तुम्ही कोणासोबत मैत्री करता यामध्ये धर्म महत्वाची भूमिका बजावतो. सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजने (CSDS) केलेल्या सर्व्हेनुसार वेगवेगळ्या धर्मातील लोक इतर धर्मातील लोकांशी मैत्री करताना धार्मिक हिताचा विचार करतात. सर्व्हेनुसार 91 टक्के हिंदू आपल्याच धर्मातील लोकांशी मैत्री करतात. तर दुसरीकडे 33 टक्के हिंदूचे जवळचे मित्र मुस्लिम धर्मातील आहेत. दुसरीकडे मुस्लिमांमध्ये ही टक्केवारी 74 टक्के आहे. 74 टक्के मुस्लिमांचं हिंदूंशी घनिष्ठ नातं आहे. तर 95 टक्के मुस्लिमांचे घनिष्ठ मित्र त्यांच्याच धर्मातील आहेत.
सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजने केलेल्या सर्व्हेमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे हिंदू आणि मुस्लिमांनी मैत्री करताना आपल्याच धर्माला प्राथमिकता दिली आहे. गुजरात, हरियाणा, कर्नाटक आणि ओडिसामध्ये मुस्लिम वेगवेगळं राहणं पसंत करत असल्याचंही या सर्व्हेत समोर आलं आहे.
या सर्व्हेत सहभागी झालेल्या हिंदूंपैकी 13 टक्के हिंदूंनी मुस्लिम कट्टर देशभक्त असल्याचं म्हटलं आहे. मात्र ख्रिश्चनांच्या बाबतीत ही आकडेवारी वेगळी आहे. 20 टक्के हिंदू ख्रिश्चनांना देशभक्त मानतात. शिखांचा उल्लेख केला असता हा आकडा 47 टक्क्यांवर पोहोचतो. मुस्लिमांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा 77 टक्के मुस्लिम आपल्या धर्मातील लोक कट्टर देशभक्त असल्याचं मानतात. दुसरीकडे 26 टक्के ख्रिश्चन मुस्लिमांमध्ये देशभक्तीची भावना असल्याचं मान्य करतात. शिखांबद्दल बोलायचं गेल्यास त्यांना फक्त 66 टक्के हिंदूंमध्ये अफाट राष्ट्रप्रेमाची भावना असल्याचं दिसत आहे.
या सर्व्हेमध्ये गावांना समावेश करुन घेतला गेलं नसल्याची शक्यता आहे. हिंदू मुस्लिंमांमधील नात्याबद्दल बोलायचं गेल्यास शहारांपेक्षा गावांमध्ये याचं रुप वेगळं आहे. तिथे राजकारणाची काही छाप नसल्याने तेथील मत वेगळं असण्याची शक्यता आहे.
सर्व्हेनुसार एकीकडे जिथे तीन-चतुर्थांथ मुस्लिम हिंदूंना आपला जवळचा मित्र मानतात, तिथे दुसरीकडे हिंदूंमध्ये हा आकडा एक-तृतीयांश आहे. म्हणजेच एक तृतीयांश हिंदू असे आहेत ज्यांच्या जवळच्या मित्रांमध्ये मुस्लिमदेखील आहेत. याउलट ख्रिश्चन धर्मातील लोक दुस-या धर्मातील लोकांशी मैत्री करण्यात जास्त रस दाखवत नाहीत. मात्र तुलना करायची झाल्यास मुस्लिमांपेक्षा हिंदूशी त्यांचे संबंध जास्त चांगले आणि घट्ट आहेत.
या सर्व्हेत गाईवरुन सरकारची भूमिका, सार्वजनिक कार्यक्रमात भारत माता की जय बोलण्याची सक्ती, गोमांस, राष्ट्रगीताला उभं राहून सन्मान देणे यासारखे प्रश्नही विचारण्यात आले. यावर वेगवेगळ्या धर्मातील लोकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्व्हेनुसार 72 टक्के लोकांनी या मुद्द्यांना जोरदार समर्थन दिलं आहे. 17 टक्के लोकांनी दबक्या आवाजात अभिव्यक्ती स्वातंत्र्याला समर्थन दिलं तर सहा टक्के लोकांना खुलेपणाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं समर्थन केलं.