संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला ४०० दिवस शिल्लक आहेत. अतिआत्मविश्वासात राहू नका. मोदी येऊन जिंकून देतील, असा विचार करू नका. स्वत: समाजाच्या सर्व घटकांमध्ये जा आणि लोकांशी संवाद साधा. विरोधी पक्षाला कमकुवत समजण्याची चूक करू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत उपस्थितांना दिला. याच बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढविण्यात आला. याचा अर्थ २०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक भाजप नड्डा यांच्या नेतृत्वात लढणार आहे. कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक पंतप्रधान मोदी यांच्या संबोधनानंतर समाप्त झाली. ते म्हणाले की, कोण कोणत्या जातीधर्माचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे, कोणाला मत देणार आहे याची चिंता न करता प्रत्येक घटकांशी संवाद साधा.
वाचाळवीर नेत्यांना समज
पंतप्रधान मोदी यांनी वाचाळवीर नेत्यांना फटकारताना स्पष्ट केले की, आमच्या सरकारने कोणत्याही व्यक्तीला पंतप्रधान आवास योजनेत घर देताना, उज्ज्वला योजनेत गॅस देताना, आयुष्मान योजनेचे कार्ड देताना ही काळजी केली नाही की, ती व्यक्ती कोणत्या धर्माची, जातीची अथवा राजकीय पक्षाची आहे. ते कोणाला मत देतात, याचा विचार न करता समाजातील सर्व वर्गाला योजनांचा लाभ देण्याचे काम केले, पण या मेहनतीवर पक्षाचे काही वाचाळवीर नेते धर्म, जातीच्या नावावर वक्तव्ये करून त्यावर पाणी फेरण्याचे काम करतात. हिंदू-मुस्लीम करत वक्तव्ये करतात. राजकारणाची चिंता न करता, मतांची चिंता न करता समाजाच्या प्रत्येक वर्गातील लोकांमध्ये जाऊन संवाद साधा.
नड्डा यांच्या नेतृत्वात २०२४ची लढाई; कार्यकाळ वाढविला
जे. पी. नड्डा यांचा भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवण्यात आला. याबाबत लोकमतने ४ जानेवारी रोजी वृत्त दिले होते. त्यावर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंगळवारी शिक्कामोर्तब झाले. याबाबत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाचे जोरदार टाळ्यांनी स्वागत झाले. सर्वानुमते नड्डा यांचा कार्यकाळ वाढविण्यात आला. अमित शहा म्हणाले की, भाजपमध्ये संघटन निवडणुका बूथ स्तरापासून तालुका, जिल्हा स्तरापर्यंत होतात. पण, कोरोनामुळे संघटनेच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे कार्यकाळ वाढवावा लागला.
नरेंद्र मोदीही टाळत नाहीत जे.पी. नड्डा यांची सूचना
नड्डा यांच्या कोणत्याही सूचनेला पंतप्रधान मोदी नकार देत नाहीत. दिल्लीतील रोड शोला अगोदर मोदी यांनी नकार दिला होता. मात्र, नड्डा यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते तयार झाले.