Delhi Election 2020 : अर्ध्याहून अधिक उमेदवार फक्त बारावी पास, 16 अशिक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 11:02 AM2020-02-04T11:02:26+5:302020-02-04T11:24:41+5:30
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीमध्ये नशीब आजमावणारे 51 टक्के उमेदवार हे फक्त बारावी पास आहेत.
नवी दिल्ली - देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीमध्ये नशीब आजमावणारे 51 टक्के उमेदवार हे फक्त बारावी पास असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म (एडीआर) या संस्थेच्या संशोधनातून पुढे आली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एडीआरने आपल्या संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातून अनेक बाबी समोर येत आहेत. आपल्या भागातील लोकप्रतिनिधी निवडताना लोकांपुढेच प्रश्न निर्माण होईल अशाही बाबी या अहवालात नमूद आहेत.
दिल्लीतून गुन्हेगारीचा नायनाट करण्याचे वचन देऊन निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांवरच गंभीर गुन्हे असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी समोर आली आहे. त्यानंतर आता अर्ध्याहून अधिक उमेदवार फक्त बारावी पास असल्याची माहिती मिळत आहे. एडीआरच्या अहवालानुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांपैकी 340 म्हणजे तब्बल 51 टक्के उमेदवारांचे शिक्षण पाचवी ते बारावीपर्यंत आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांसोबतच इतर सर्वांचाच समावेश आहे. 16 उमेदवार हे पूर्णपणे अशिक्षित असल्याची माहिती पुढे आली आहे. 298 उमेदवार म्हणजे 44 टक्के उमेदवार पदवीधर किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले आहेत. बारा उमेदवारांकडे पदविका आहे तर सहा उमेदवारांची शिक्षित म्हणून नोंद घेण्यात आली आहे. मुख्य म्हणजे या संपूर्ण परिस्थितीत 90 उमेदवार पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आणि 11 उमेदवार आचार्यपदवी घेतलेले आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या एकूण 672 उमेदवारांपैकी 20 टक्के म्हणजेच 133 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाच्या 51 टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर)च्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. या अहवालानुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचे 25 टक्के उमेदवार आणि भाजपाच्या 20 टक्के उमेदवारांनी निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याविरोधात गंभीर गुन्हे असल्याचे नमूद केले आहे. तसेच काँग्रेसच्या 15 टक्के उमेदवारांनीही आपल्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे.
सत्तेत आल्यावर पारदर्शक कारभार करू असं आश्वासन सर्वच पक्ष देत असतात. आपच्या 36 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. तर भाजपाच्या 67 पैकी 17 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. यामध्ये काँग्रेस तिसऱ्या, तर बसपा चौथ्या स्थानी आहे. याबाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पाचव्या क्रमांकावर आहे. 2015 च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत अशा उमेदवारांची संख्या अधिक आहे. त्यावेळी निवडणूक रिंगणात 673 उमेदवार होते. त्यातील 17 टक्के म्हणजेच 114 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल होते.
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन येणार की नाही?; उद्धव ठाकरे म्हणतात...
जवानांना आवश्यकतेनुसार जेवण, कपडे मिळत नाहीत; कॅगचा ठपका!
प्राध्यापिकेला भररस्त्यात पेट्रोल टाकून पेटविले; महाराष्ट्र हळहळला, सर्वत्र संतापाची भावना
China Coronavirus : चीनमधील मृतांची संख्या ३६१; आतापर्यंत १७,२०५ लोकांना संसर्ग