नवी दिल्ली : जगातील अमेरिकेसह अनेक देशांत कोरोनाने माजविलेल्या हाहाकाराच्या तुलनेत भारतातील स्थिती खूपच बरी आहे. भारतामध्ये दर १० लाख लोकांमागे फक्त नऊ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असून, हे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत सर्वात अत्यल्प आहे. दर १० लाख लोकांमागे स्पेनमध्ये ३,८६४ जणांना, इटलीमध्ये २,७३२ तर फ्रान्समध्ये २,२६५ व अमेरिकेत १,९४६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी दिली आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोनाचा संसर्ग व त्यामुळे होणारे मृत्यू यांचे प्रमाण कमी राखण्यात भारताला यश आले आहे. दर १० लाख लोकांमागे भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ०.३ इतके व जगात अशा प्रकारच्या आकडेवारीत सर्वात कमी आहे. कोरोनामुळे दर दहा लाख लोकांमागे स्पेनमध्ये ४०२, इटलीमध्ये ३५८, फ्रान्समध्ये २६३ लोक मरण पावले आहेत. भारतामध्ये कोरोनाच्या रुग्णांनी दहा हजारचा आकडा ओलांडला त्यावेळेस देशभरात २,१७,५५४ जणांची या साथीसंदर्भातील वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली होती. कॅनडामध्ये आतापर्यंत२,९५,०६५ लोकांची कोरोनाविषयक चाचणी करण्यात आली आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स यासह काही देशांमध्ये गेल्या दोन तीन दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये ७५ ते ३०००पर्यंत वाढ झाली आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या इतक्या प्रमाणात वाढण्यास भारतात मात्र ४ दिवस लागले. भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ६ हजारवरून १२ हजारपर्यंत वाढण्यास सहा दिवस लागले.देशातील बळींमध्ये बहुतांश ५९ वर्षे वयावरीलभारतामध्ये आतापर्यंत ४००पेक्षा अधिक बळी गेले असून त्यातील बहुतांश लोकांचे वय ५९ वर्षांपेक्षा जास्त आहे. मृतांपैकी अनेकजणमधुमेह, हृदय, मूत्रपिंडाचे आजार, उच्च रक्तदाब अशा आजारांनी पूर्वीपासून ग्रस्त होते.