ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 16 - सर्व सजिवांना जिवंत राहण्यासाठी श्वसन ही अत्यावश्यक बाब आहे हे सर्वानांच माहीत आहे. श्वसनादरम्यान, सजीव ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डाय ऑक्साइड बाहेर सोडतात, हेही तुम्ही शाळेत शिकला असाल, पण राजस्थानच्या शिक्षणमंत्र्यांनी एक अजबच शोध लावला आहे. गाय हा असा एकमेव प्राणी आहे जो श्वासोच्छ्वासासाठी ऑक्सिजन घेऊन पुन्हा ऑक्सिजन बाहेर सोडतो, असा दावा या महाशयांनी केला आहे.
हिंगोनिया गोशाला येथे अक्षय पात्रा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी अजब दावा केला आहे. ते म्हणतात, गाय ही एकमेव प्राणी आहे जी श्वसनासाठी ऑक्सिजन ग्रहण करते आणि पुन्हा ऑक्सिजनच वातावरणात सोडते, त्यामुळे गायीचे वैज्ञानिक महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे, तसेच हा संदेश सर्व लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.