नवी दिल्ली - दिल्लीतील रामलीला मैदानावर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे केजरीवाल आता काँग्रेसच्या दिवंगत नेत्या शीला दीक्षित यांच्यानंतर तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे दुसरे नेते ठरले आहे. मात्र केजरीवालांच्या शपथविधीला जवळजवळ संपूर्ण विरोधीपक्ष गायब होता. एका भाजपनेत्याने या शपथविधीला हजेरी लावली. मात्र या नेत्याला कार्यक्रमात बसण्यासाठी आसन मिळाले नाही की, कारसाठी पार्किंग. खुद्द या नेत्यानेच असा आरोप केला आहे.
दिल्लीतील रोहिणी मतदार संघाचे भाजप आमदार विजेंद्र गुप्ता केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षातही कुटुंबवाद फोफावत असल्याचा आरोप केला. त्यांनी ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली.
मी विरोधी पक्षाचा सदस्य आहे. मात्र आपमध्ये कुटुंबवाद सुरू झाला आहे. शपथविधीला हजेरी लावणे हे माझे नैतिक कर्तव्य होते. मात्र कार्यक्रमात नातेवाईकांना समोरच्या रांगेत बसविण्यात आले आहे. मला मागच्या रांगेत ढकलण्यात आल्याचे विजेंद्र गुप्ता यांनी म्हटले आहे. त्यांनी केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी 'आप'च्या शपथविधी सोहळ्यात आपल्याला बसण्यासाठी आसण आणि गाडीसाठी पार्किग मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.