नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या एकमेव घोडदळात आता घोड्यांची जागा रणगाडे घेणार आहेत. लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरस्थित या ६१ कॅवलरी रेजिमेंटमध्ये बदल करण्यासाठीची प्रक्रिया गतिमान करण्यात आली असून, या रेजिमेंटला अधिक समकालीन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, देशाच्या विविध भागांत तीन स्वतंत्र हत्यारबंद स्क्वाड्रन्स आहेत आणि यांना ६१ कॅवेलरी अंतर्गत आणले जाईल. यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च येणार नाही. कारण हे आधीपासूनच रणगाड्यांनी सुसज्ज आहेत.कोरोनाच्या निर्बंधांमुळे या स्थित्यंतरासाठी पाच महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. रेजिमेंटचे कामकाज नव्या जागी सुसज्ज स्थिती सुरू केले जाईल. या रेजिमेंटमधील घोडे दिल्लीमध्ये स्थलांतरित करण्यात येणार असून, ते लष्कराच्या आर्मी पोलो व रायडिंग क्लबमध्ये समाविष्ट करण्यात येतील.या रेजिमेंटचे सक्रिय सुसज्ज रेजिमेंटमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय लेफ्टनंट जनरल डी. बी. शेखतकर यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या शिफारशीवरून घेण्यात आला आहे.लष्कराची युद्धक्षमता विकसित करणे व लष्कराच्या खर्चाचे पुनर्संतुलन साधणे, याबाबत अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली होती. डिसेंबरमध्ये २०१६ मध्ये या समितीने आपला अहवाल सादर केला होता.- घोडदळाच्या रेजिमेंटची भूमिका आतापर्यंत केवळ औपचारिकच राहिली होती. विविध प्रसिद्ध घोडेस्वार या रेजिमेंटने दिलेले आहेत.1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर विविध संस्थाने भारतात विलीन करण्यात आल्यानंतर लगेच ६१ कॅवलरीची निर्मिती करण्यात आली होती. त्यावेळी विविध राज्यांची सर्व नियमित, अनियमित दले एकत्रित करून हॉर्स कॅवलरी रेजिमेंट तयार करण्यात आले होते.1954 मध्ये ग्वाल्हेर लान्सर्स, जोधपूर/कछवा हॉर्स व म्हैसूर लान्सर्सचे एकत्रीकरण करून ६१ व्या कॅवलरीची स्थापना करण्यात आली होती. आता याचे यांत्रिकीकरण करण्यात आल्यामुळे राष्टÑपतींच्या अंगरक्षक दलात (पीबीजी) लष्करातील एकमेव घोडदळ उरले आहे. त्याचे स्वरूप औपचारिक आहे.
भारतीय लष्करातील एकमेव घोडदळात आता घोड्यांची जागा रणगाडे घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 2:31 AM