नवी दिल्लीः केंद्रातील मोदी सरकार देशाला तोडण्याचं काम करतंय. पण काँग्रेसच्या 'हाता'त या देशाला पुन्हा जोडण्याची शक्ती आहे आणि ते काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचंय, अशी साद काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पक्षाच्या महाअधिवेशनात घातली.
देशातील तरुण आज हतबल दिसताहेत. ते मोदींकडे पाहतात, तेव्हा त्यांना कुठलाच मार्ग दिसत नाही. रोजगार कुठून मिळेल, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव कसा मिळेल, हे गंभीर प्रश्न आहेत. त्यातून काँग्रेस पक्षच दिशा दाखवू शकतो, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल यांनी पहिल्यांदाच पक्षाच्या महाअधिवेशनात भाषण केलं. ते काय बोलतात, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. परंतु, आपली सगळ्यांची मतं ऐकून समारोपाचं भाषण मी मोठं करेन, त्यात पक्षाची पुढची दिशा ठरवली जाईल, असं सांगून राहुल यांनी उद्घाटनाचं भाषण छोटेखानीच केलं.
राहुल गांधी यांच्या भाषणातील ठळक मुद्देः
>> आज देशात द्वेष पसरवण्याचं काम सुरू आहे. एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीशी लढवून देशाचं विभाजन केलं जातंय. अशावेळी आपलं काम देश जोडण्याचं आहे.
>> हात हे काँग्रेसचं चिन्हं भारत जोडण्याचं काम करू शकतं, देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतं.
>> काँग्रेस पक्षाला आणि देशाला दिशा दाखवण्याचं काम आपल्याला एकत्र मिळून करायचं आहे. त्यासाठी पक्षातील ज्येष्ठ आणि तरुण यांची फळी उभी करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे.
>> देश हताश, हतबल झालाय. त्याला दिशाच सापडत नाहीए. ती दिशा आपण दाखवू. आजचे सत्ताधारी हे राग, तिरस्कार करताहेत. आपण प्रेमाने आणि बंधुभावाने देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी काम करू.