'वेडा माणूसच अशी वक्तव्ये करू शकतो', अशोक गेहलोतांचा मणिशंकर अय्यर यांच्यावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 20:00 IST2025-03-06T19:59:50+5:302025-03-06T20:00:44+5:30
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी दिवंगत राजीव गांधींबाबत केलेल्या वक्तव्याने नवा वाद झाला आहे.

'वेडा माणूसच अशी वक्तव्ये करू शकतो', अशोक गेहलोतांचा मणिशंकर अय्यर यांच्यावर निशाणा
Mani Shankar Aiyar : काँग्रेसचे ज्येष्ठ मणिशंकर अय्यर यांनी भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी, यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळू आला आहे. अशातच, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी अय्यर यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. अशोक गेहलोत म्हणाले की, मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानबाबत ज्याप्रकारे वक्तव्य केले आहे, असे वक्तव्य एखादा वेडाच करू शकतो.
गेहलोत यांनी मणिशंकर अय्यर यांच्या राजीव गांधींबाबत केलेल्या वक्तव्यावरही नाराजी व्यक्त करत हे विधान त्यांच्या निराशेचा कळस असल्याचे म्हटले आहे. अशी बेजबाबदार विधाने काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात असून पक्षाच्या प्रतिमेला हानी पोहोचवणारी आहेत, असेही ते म्हणाले.
अशोक गेहलोत म्हणाले की, राजीव गांधी पंतप्रधान असताना मी मणिशंकर अय्यर यांना भेटलो होतो. मणिशंकर अय्यर गेल्या 8-10 वर्षांपासून वक्तव्ये करत आहेत. त्यांनी यापूर्वीही पीएम मोदींबद्दल वादग्रस्त विधाने केली होती. त्यांची अशी वादग्रस्त विधाने सातत्याने समोर येत आहेत. केवळ वेडाच असे बोलू शकतो. ते पाकिस्तानबाबत काय विधाने करत आहेत, हेही त्यांना कळत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, मणिशंकर अय्यर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते म्हणतात की, राजीव गांधी पंतप्रधान झाले तेव्हा माझ्यासह अनेकांना वाटले की, हे पंतप्रधान कसे होऊ शकतात? ते एअरलाइनचे पायलट होते, विद्यापीठात दोनदा नापास झाले होते. मी त्यांच्यासोबत केंब्रिजमध्ये शिकलो आहे. ते असा ठिकाणी नापास झाले, जिथे पास होणे खूप सोपे असायचे. यानंतर त्यांनी लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, पण तिथेही नापास झाले. असा माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो, असा प्रश्न मला पडला, असे वक्तव्य अय्यर यांनी केले आहे.