चेन्नई - तामिळनाडूच्या राजकारणात सध्या महत्वाच्या घडामोडी घडत असून थलायवा रजनीकांत यांच्यानंतर कमल हासन यांनीही आपल्या नवीन पक्षाची घोषणा करत धडाक्यात एंट्री केली आहे. रजनीकांत आणि कमल हासन आमने-सामने आल्याने आता मोठ्या पडद्यावरील संघर्ष राजकारणातही पहायला मिळेल असा अंदाज अनेकजण व्यक्त करत आहेत. दरम्यान रजनीकांत यांनी आपलं आणि कमल हासनचं ध्येय एकच असल्याचं सांगत आपल्या सध्या तरी स्पर्धा नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना रजनीकांत यांनी सांगितलं की, 'कमल हासन यांची प्रचारसभा पाहिली, फार चांगली झाली. आमचे मार्ग आणि स्टाईल वेगळी असली तरी उद्दिष्ट एकच आहे ते म्हणजे लोकांचं भलं करणं'.
मदुराईमध्ये कमल हासन यांनी बुधवारी पक्ष स्थापनेसाठी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी नवीन पक्षाची घोषणा केली. या सभेदरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह काही राजकीय नेते आणि कमल हासन यांच्या चाहत्यांनी हजेरी लावली. पक्षाचे नाव घोषित करताना कमल हासन म्हणाले की, मक्कल नीथी मय्यम' पार्टी तुमची आहे. ही पार्टी लोकांसाठी आहे. मी फक्त तुमचा प्रतिनिधी आहे, तुमचा नेता नाही. मी तुमच्याकडून राजकीय सल्ल्याची मागणी करत आहे. कमल हासन यांनी आपल्या नव्या राजकीय पक्षाचे नाव 'मक्कल नीथी मय्यम' असे जाहीर केले असून पक्षाचे चिन्ह आणि झेंड्याचेही अनावरण करण्यात आले. 'मक्कल नीथी मय्यम' चा अर्थ होतो 'लोक न्याय पक्ष' (People Justice Party).
काही दिवसांपुर्वी रजनीकांत आणि कमल हसन यांच्या भेटीने तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले होते. कमल हसन यांनी रजनीकांत यांच्या घरी 'स्नेहभोजन' घेतलं होतं. या भेटीनंतर ही केवळ सदिच्छा भेट होती, असे दोन्ही 'सुपरस्टार' नेत्यांकडून सांगण्यात आले होते.
रजनीकांत यांनी आपण 234 जागांवर निवडणूक लढू, असं जाहीर केलं आहे. 'काही लोक राजकारणाच्या नावावर लोकांना लुटतायत. त्यांच्या विरोधात मी आवाज उठवणार. आपण लोकशाहीचे रक्षक आहोत. चुकीच्या गोष्टींबद्दल आवाज उठवला पाहिजे', असं ते बोलले होते.