नवी दिल्ली : भूमी अधिग्रहण वटहुकूमाच्या विरोधात आपण सुरू केलेल्या आंदोलनात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे सहभागी होऊ शकतात. मात्र त्यांना आपल्यासोबत मंचावर बसता येणार नाही, असे समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. भूमी अधिग्रहण वटहुकूम हा पूर्णपणे शेतकरीविरोधी आणि उद्योगपतींच्या हिताचा आहे. आता केवळ उद्योगपतींसाठी अच्छे दिन येणार आहेत असे दिसते, असेही हजारे यांनी स्पष्ट केले.केजरीवाल आणि राहुल गांधी यांना सामान्य कार्यकर्त्यांसोबत मंचासमोर बसता येईल, असे हजारे यांनी सांगितले. ७७ वर्षीय अण्णा हजारे हे भूमी अधिग्रहण वटहुकूमाच्या विरोधात उद्या सोमवारपासून नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे दोन दिवसांचे आंदोलन करणार आहेत. आपण केजरीवाल यांच्याशी फोनवर बोललो. उद्या सोमवारी त्यांना भेटून पुढच्या आंदोलनाविषयी चर्चा करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.काँग्रेसनेही या आंदोलनाला पाठिंबा देऊ केला आहे, याकडे लक्ष वेधले असता अण्णा म्हणाले, राजकीय पक्ष अशा परिस्थितीचा परस्परांविरुद्ध फायदा करून घेत असतात. राहुल गांधी यांना जर आंदोलनात सामील व्हावे असे वाटत असेल तर ते येऊ शकतात आणि लोकांमध्ये बसू शकतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)
फक्त उद्योगपतींसाठी ‘अच्छे दिन’ येणार
By admin | Published: February 22, 2015 11:49 PM