ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ल्याचा कट आखणा-या सूत्रधारांवर पाकिस्तानने कारवाई केली नाही तर, भारत-पाकिस्तानमध्ये परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा रद्द होऊ शकते असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सोमवारी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
पाकिस्तानने कारवाई केली तरच, भारत चर्चा करेल असे डोवाल यांनी स्पष्ट केले. १५ जानेवारीला भारत-पाकिस्तानमध्ये परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा होणार आहे.
मागच्या आठवडयात भारताने, पाकिस्तानला कारवाई करण्यायोग्य पुरावे दिले असून, आता चेंडू पाकिस्तानच्या कोर्टात असल्याचे स्पष्ट केले होते. आज सकाळी दैनिक भास्कर वर्तमानपत्राने भारत-पाकिस्तानमध्ये परराष्ट्र सचिव स्तरावरची चर्चा रद्द झाल्याचे वृत्त दिले होते.
डोवाल यांच्या मुलाखतीच्या आधारे दैनिक भास्करने हा दावा केला होता. हे वृत्त प्रसारीत झाल्यानंतर काहीवेळाने भारताने पाकिस्तानसोबत परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा रद्द केल्याचे वृत्त चुकीचे असून, आपण अशी कोणतीही मुलाखत दैनिक भास्करला दिली नसल्याचा खुलासा केला डोवाल यांनी केला होता.