ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,दि.19 - भारतातली सरकारी कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचं उत्पन्न पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. विश्वास बसत नसला तरी हे खरं आहे. वर्ष 2015 मध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा महसूल हा पाकिस्तानपेक्षा तब्बल 40 टक्के जास्त होता. 2015 मध्ये इंडियन ऑइलचं महसुली उत्पन्न 54.7 अब्ज डॉलर इतकं होतं, तर पाकिस्तानचं महसुली उत्पन्न 38.7 अब्ज डॉलर इतकाच होता. ब्रिटनची संस्था 'ग्लोबल जस्टिस नाउ'ने नुकत्याच केलेल्या एका सर्वेमध्ये ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, महसुली उत्पन्नामध्ये असलेल्या टॉप 100 मध्ये 69 या कंपन्या आहेत.
या सर्व्हेनुसार, जगातील 10 मोठ्या कॉर्पोरेशनची कमाई ही अनेक देशांच्या संयुक्त कमाईपेक्षाही जास्त आहे. वॉलमार्ट, अॅपल, शेल या तिन्ही कंपन्यांचा एकूण महसूल हा 180 गरीब देशांच्या एकूण उत्पन्नापेक्षा जास्त आहे. या गरीब देशांमध्ये दक्षिण अफ्रीका, इराक, आयर्लंड, इंडोनेशिया, इस्त्राइल, कोलंबिया, ग्रीस आणि विएतनाम आदी देशांचा समावेश आहे.
बड्या कंपन्यांकडे असलेल्या अफाट संपत्ती बद्दल बोलताना 'ग्लोबल जस्टिस नाउ'चे संचालक निक डियरडेन म्हणाले की, मोठ्या कॉर्पोरेशनकडे इतकी गडगंज संपत्ती आणि ताकद असणं हे जगातील अनेक समस्यांचं मुख्य कारण आहे. स्वतःच्या फायद्यासाठी या कंपन्या मूलभूत मानवी हक्क दडपतात. अशा मोठ्या कॉर्पोरेशन्सची मदत करू नये यासाठी 'ग्लोबल जस्टिस नाउ' ब्रिटन सरकारवर सातत्याने दबाव आणत आहे.