जम्मू : काश्मीरला सध्याच्या परिस्थितीतून फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच बाहेर काढू शकतात, असा विश्वास जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी शनिवारी येथे व्यक्त केला. काश्मीरला दलदलीतून बाहेर काढावे, असे आवाहनही त्यांनी मोदींना केले. खोऱ्यातील निदर्शनांच्या सत्रामुळे मुफ्ती यांचे सरकार जेरीस आलेले आहे. काश्मिरातील सध्याच्या परिस्थितीला केंद्रातील यापूर्वीचे संपुआ सरकार जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला. जम्मू आणि काश्मीर समस्येची सोडवणूक फक्त मोदीच करू शकतात. त्यांच्याकडे प्रचंड बहुमत आहे. त्यांनी कोणताही निर्णय घेतला तरी त्याला देशाचा पाठिंबा राहील. उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना त्या म्हणाल्या, लाहोरला भेट देण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाची प्रशंसा करताना त्या म्हणाल्या की, हे सामर्थ्याचे चिन्ह आहे ना की, दुर्बलतेचे. त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर हल्ला केला. पाकला भेट देण्याचे धैर्य सिंग यांच्याकडे नव्हते, असे त्या म्हणाल्या. सिंग यांचे जन्मगाव पाकिस्तानात आहे. मोदी यांच्या आधी सिंग पाकला जाऊ इच्छित होते. मात्र, जाऊ शकले नाहीत. त्यांनाही (सिंग) दोन्ही देशांतील संघर्ष थांबविण्याचा प्रयत्न करून जम्मू आणि काश्मीरला या दुर्दैवी परिस्थितीतून बाहेर आणता येऊ शकले असते; परंतु त्यांच्यात तेवढे साहस नव्हते. (वृत्तसंस्था)
काश्मीरला केवळ मोदीच वाचवू शकतील - मुफ्ती
By admin | Published: May 07, 2017 5:17 AM