लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : राजस्थान विधानसभेच्या मतदानाचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये लढल्या जात असलेल्या निवडणुकीच्या प्रचारात अनेक राष्ट्रीय व स्थानिक मुद्द्यांवर भर दिला जात आहे. परंतु संपूर्ण निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याभोवतीच केंद्रित झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही भाजपसाठी राजस्थानसह अन्य राज्यांमध्ये मोठी ताकद मानली जात आहे, दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे त्यांनी राबविलेल्या कल्याणकारी योजना आणि गॅरंटीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी वसुंधराराजे यांचे नाव जाहीर केले नसले, तरी सध्या त्यांच्याच नावाची चर्चा राज्यातील मतदारांमध्ये सुरू आहे.