ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच काश्मीर समस्या सोडवू शकतात असं जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती बोलल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सध्या दगडफेक आणि दहशतवादी घटनांमध्ये वाढ होत असून यादरम्यान मेहबूबा मुफ्ती यांचं हे वक्तव्य आलं आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेचा मोठा पाठिंबा असून तेच काश्मीरला या दलदलीतून बाहेर काढू शकतील", असा विश्वास मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केला आहे.
मेहबूबा मुफ्ती बोलल्या आहेत की, "जर आपल्याला या दलदलीतून कोणी बाहेर काढू शकत असेल तर ते आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. मोदी जो काही निर्णय घेतील त्याचं देशवासी समर्थन करतील".
यावेळी बोलताना मेहबूबा मुफ्ती यांनी मोदींच्या पाकिस्तान दौ-याला धाडसी म्हणत कौतुगौद्गार काढले. "मोदींनी दोन्ही देशांमध्ये तणाव असताना पाकिस्तानचा दौरा केला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीदेखील पाकिस्तान दौ-याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र दौरा करण्याची त्यांची हिंमत झाली नाही. पंतप्रधान मोदींचा लाहौर दौरा त्यांच्यातील हिंमत आणि साहसीपणाचं दर्शन घडवतं", असं त्यांनी म्हटलं आहे.
जम्मू काश्मीरमध्ये हिंसा आणि दहशतवादी घटनांमध्ये वाढ होत असून अशावेळी मेहबूबा मुफ्ती यांनी हे वक्तव्य केलं आहे. खो-यात सुरक्षा जवान आणि सामान्य नागरिकांमध्ये रोज चकमक उडत आहे. 15 एप्रिल रोजी सुरक्षा जवानांनी पुलवामा येथील एका कॉलेजमध्ये प्रवेश करत विद्यार्थ्यांना मारहाण केल्यानंतर खो-यातील वातावरण तणावपूर्ण झालं आहे. दहशतवादी घटना, बँक लुटण्याचे प्रकार यामध्ये वाढ झाली असून सरकारसमोर मोठं आव्हान आहे.