ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - गेल्या काही वर्षांपासून भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. त्यामुळे देशातील नागरिकांची आर्थिक स्थितीही वेगाने सुधारत आहे. पण सव्वाशे कोटींच्या भारतात केवळ 1 टक्का लोकच प्राप्तिकर भरतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी ही माहिती दिली आहे. त्याबरोबरच देशातील 95 टक्के अर्थव्यवस्था ही रोखीने व्यवहार करते, हा भार देश फार काळ वाहू शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय आपतकालीन व्यवस्थापन विभागाने (एनडीआरएफ) रोखरहीत व्यवहाराबाबत आयोजित केलेल्या कार्यशाळेला संबोधित करताना ही माहिती दिली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला 2030 पर्यंत जर 10 हजार अब्ज डॉलरचा टप्पा गाठण्याचे लक्ष्य गाठायचे असेल तर रोख व्यवहारांवरील भार कमी करावा लागेल, असे त्यांनी सांगितले. देशाला आघाडीच्या अर्थव्यावस्थांमध्ये पोहोचवण्यासाठी 26 कोटी नागरिकांना जनधन खात्यातून बँक व्यवहाराशी जोडण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.