Ashwini Vaishnaw: फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. १५ फेब्रुवारी रोजी महाकुंभला जाण्यासाठी नवी दिल्ली स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन चेंगराचेंगरी झाली होती. त्या दिवशी प्रमाणापेक्षा जास्त प्लॅटफॉर्म तिकीटे विकली गेली होती अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली. त्यानंतर ट्रेनमधील जागांच्या संख्येनुसार रेल्वे तिकीट जारी करेल, असा निर्णय घेण्यात आला. आता वेटिंग तिकीट असणाऱ्यांना स्टेशनमध्ये प्रवेश देण्यात येणार नसल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव सांगितले.
रेल्वे स्थानकांवर गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत दिली. यामध्ये रुंद फूट ओव्हरब्रिज, सीसीटीव्ही आणि वॉर रूमची व्यवस्था करण्यात आल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. सण आणि यात्रांमध्ये होणारी प्रचंड गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेने मर्यादित प्रवेश नियंत्रण प्रणाली लागू केली आहे. या प्रणालीनुसार स्थानकांच्या बाहेर होल्डिंग एरिया तयार केले गेले आहेत. कारण ट्रेन प्लॅटफॉर्मवर येईपर्यंत प्रवाशांना प्रवेश दिला जाणार नाही, असंही अश्विनी वैष्णव म्हणाले.
"२०२४ च्या सणासुदीच्या काळात सुरत, उधना, पाटणा आणि नवी दिल्ली येथे होल्डिंग एरिया तयार करण्यात आले होते. महाकुंभ दरम्यान, प्रयागराजच्या नऊ स्थानकांवरही ही प्रणाली लागू करण्यात आली होती. इथला प्रतिसाद पाहता देशभरातील ६० स्थानकांवर कायमस्वरूपी होल्डिंग एरिया तयार केले जाणार आहेत," असं अश्विनी वैष्णव यांनी सांगिते.
"आता देशभरातील ६० स्थानकांवर, जिथे वेळोवेळी गर्दी असते तिथे संपूर्ण प्रवेश नियंत्रण यंत्रणा लागू केली जाईल. केवळ कन्फर्म आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळणार आहे. तर प्रतीक्षा यादीत आणि तिकीट नसलेल्या प्रवाशांना बाहेरील वेटिंग एरियामध्ये थांबावे लागेल. अनधिकृत एंट्री पॉइंटही सील केले जातील. तसेच वृद्ध, निरक्षर आणि महिला प्रवाशांना मदत करण्यासाठीच प्लॅटफॉर्म तिकीट जारी केले जातील," अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.