नवी दिल्ली : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणी दाेषी ठरलेल्या ए. जी. पेरारीवलन याची सुटका करण्याचा निर्णय तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुराेहित यांनी राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्यावर साेपविला आहे. याबाबत केंद्र सरकारने सर्वाेच्च न्यायालयाला माहिती दिली.राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती न्यायालयाला देण्यात आली. सर्व तथ्ये, कागदपत्रे, पुरावे व कायदेशीर नाेंदीचा विचार करता राष्ट्रपतीच याबाबत निर्णय घेण्यासाठी याेग्य व्यक्ती असल्याचे राज्यपालांनी केंद्र सरकारला कळविले आहे. ही माहिती केंद्राच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात देण्यात आली. तामिळनाडूच्या विधानसभेने सप्टेंबर २०१८ मध्ये राजीव गांधी हत्या प्रकरणातील दाेषी नलिनी, मुरूगन, संथन, जयकुमार, रविचंद्रन, राॅबर्ट प्यास आणि पेरारीवलन यांची सुटका करण्याचा ठराव पारित केला हाेता. या मुद्द्यावरुन आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये वातावरण तापण्याची शक्यता आहे.
पेरारीवलनच्या सुटकेबाबत निर्णय घेण्यास राष्ट्रपतीच सक्षम, राज्यपालांची केंद्राला माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 6:04 AM