ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - एअर इंडियाच्या कर्मचा-याला चप्पलेनं मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांनी घडल्या प्रकाराबाबत खेद व्यक्त केला असला तरीही त्यांच्या मागील समस्या कमी होण्याचं नाव घेत नाहीत. कारण गायकवाड यांच्याविरोधात एअर इंडियानं आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जोपर्यंत रविंद्र गायकवाड विनाशर्त एअर इंडियाची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावरील निर्बंध कायम ठेवावेत, अशी मागणी ऑल इंडिया केबिन क्रू असोसिएशन (AICCA)ने केली आहे.
गायकवाड हे विमानातील कर्मचा-यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकायक आहेत, याचा सरकारने विचार करावा, असेही AICCAनं नमूद केले आहे. शिवाय, गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचा-यांची विनाशर्त माफी मागावी आणि सर्व नियमांचं पालन करण्याची लेखी स्वरुपात हमी द्यावी, अशी मागणीही AICCAकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, एअर इंडियानं 17 आणि 24 एप्रिलचे गायकवाड यांचे तिकीट रद्द करुन त्यांना दे धक्का दिल्याचीही माहिती समोर आली आहे.
AICCA नं एअर इंडियाला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, असोसिएसन एअर इंडिया कर्मचा-यांचं समर्थन करत असून रविंद्र गायकवाड यांच्याकडून माफीची मागणी केली आहे. इकॉनॉमी श्रेणीमध्ये बसवल्याच्या रागातून एअर इंडियाच्या व्यवस्थापकाला चपलेने मारहाण केल्यानं गायकवाड यांना 7 एअरलाईन्स कंपन्यांनी हवाई प्रवास बंदी केली आहे. यामुळे सध्या ते अडचणीत आले आहेत.
गुरुवारी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी लोकसभेत गुरुवारी निवेदन करताना एअर इंडियाने आपल्यालाच गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला.ते म्हणाले की, 23 मार्च रोजी संसदेच्या अधिवेशनासाठी एअर इंडियाच्या विमानाने मी निघालो. बिझिनेस क्लास तिकिटांचे भाडे आकारून आपणास पूर्वसूचनेशिवाय इकॉनॉमी क्लासने प्रवास करायला लावला. मागणी करूनही तक्रार पुस्तक देण्यात आले नाही. दिल्ली विमानतळावर आल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा तोपर्यंत मी विमानातून उतरणार नाही, असे मी सांगितल्यानंतर ४५ मिनिटांनी एक अधिकारी आला. तो चढ्या आवाजाने माझ्याशी बोलू लागला.
मी शांततेने तुमच्याशी बोलतो आहे, तुम्हीही आवाज खाली करा, असे मी त्याला म्हणालो. नंतर आपण कोण आहात, असे विचारता त्याने, मै एअर इंडिया का बाप हूं, सिक्युरीटी अफसर हूं। असे उत्तर दिले. मी खासदार असल्याचे त्याला सांगताच, एमपी हुआ तो क्या हुआ, तू नरेंद्र मोदी है क्या? असे ओरडत त्याने माझी कॉलर पकडून ढकलण्याचा प्रयत्न केला. संतापाने मीही त्याला ढकलले. त्यावर त्याने मला शिवीगाळही केली, त्याची व्हिडीओ क्लिप उपलब्ध आहे. सदर प्रकरणामुळे संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असेल तर त्याबद्दल मी संसदेची माफी मागतो; मात्र त्या अधिकाऱ्याची माफी मी कदापि मागणार नाही.
गायकवाडांनी निवेदन केल्यानंतर विमान वाहतूक मंत्री म्हणाले की, दररोज हजारो प्रवासी विमानाने प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करता येणे शक्य नाही. शिवसेनेला सदर प्रकरण शांततेने मिटवायचे असेल, तर ते मिटवायची तयारी आहे. प्रकरण वाढवायचे असेल तर तो त्यांच्या इच्छेचा प्रश्न आहे. या विधानामुळे शिवसेना सदस्य संतप्त झाले. त्याचवेळी एखाद्यावर कोणत्या कायद्याने एअरलाइन्स एकतर्फी बंदी घालू शकतात, असा सवाल केला. त्यांच्या या प्रश्नाला अन्य विरोधी खासदारांनीही साथ दिली. परिणामी संतप्त वातावरणात आणखी भर पडली आणि अनंत गीते अशोक गजपती राजू यांच्यावर भडकले. त्यांना शांत करून, त्यांच्या आसनावर बसवण्यासाठी स्मृती इराणी व गृहमंत्री राजनाथसिंगांना हस्तक्षेप करावा लागला.
दरम्यान, या सर्व प्रकारानंतर गायकवाड यांनी नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपति राजू यांना पत्र लिहित 23 मार्ज रोजी घडलेल्या चप्पलमार प्रकरणाबाबत खेद व्यक्त केला.
त्यामुळे एअर इंडियाची मागणी रविंद्र गायकवाड मान्य करणार की नाहीत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Air India has cancelled Shiv Sena MP Ravindra Gaikwad"s Delhi-Mumbai & Mumbai-Delhi tickets for April 17 and 24 respectively: Air India Spox pic.twitter.com/8QauzcuTCn— ANI (@ANI_news) April 7, 2017
In letter to Air India,All India Cabin Crew Assocn came out in support of Air India stressing on unconditional apology by the Shiv Sena MP— ANI (@ANI_news) April 7, 2017
Must not let R Gaikwad onboard unless he tenders unconditional apology to AI employees & undertakes in writing to abide by all norms: AICCA— ANI (@ANI_news) April 7, 2017