'राम मंदिर सोहळ्यात फक्त श्रीमंत लोक दिसले, एकही गरीब नव्हता', राहुल गांधींचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 05:25 PM2024-02-16T17:25:55+5:302024-02-16T17:26:33+5:30
'मोदींनी शेतकऱ्यांचा एक रुपयाही माफ केला नाही, पण देशातील अब्जाधीशांचे 16 लाख कोटी रुपये माफ केले.'
Rahul Ganghi Hits BJP: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली भारत जोडो न्याय यात्रा बिहारनंतर आता उत्तर प्रदेशात दाखल झाली आहे. लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी राहुल गांधींनी बिहारमधील मोहनिया येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली.
'देशात द्वेषाचे वातावरण'
राहुल म्हणाले, भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणीने देशात द्वेष आणि हिंसाचार पसरवला आहे. या द्वेषाच्या विरोधात आम्ही एकत्र लढू आणि जिंकू. यात्रेदरम्यान आम्ही लोकांना विचारले की, देशात जे द्वेषाचे वातावरण निर्माण होताहे, त्याचे कारण काय? त्यावर आम्हाला एकच उत्तर मिळाले की, द्वेषाचे कारण भीती आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अन्याय होतोय. शेतकरी, तरुण, महिलांवर आर्थिक, सामाजिक, अन्याय होतोय. अग्निवीर शहीद झाला, त्याला शहीदाचा दर्जा दिला जात नाही, पेंशन दिली जात नाही. सरकारकडून सैनिकांची फसवणूक होत आहे.
'बहुतांश लोकसंख्या बेरोजगार'
ते पुढे म्हणाले की, बिहारच्या तरुणांना रेल्वेत नोकऱ्या मिळत नाहीत, कारण केंद्र सरकारला तुम्ही सर्वांनी कंत्राटी कामगार व्हावे अशी इच्छा आहे. देशात मागासवर्गीयांची लोकसंख्या 50 टक्के, दलित वर्ग 15 टक्के, आदिवासी वर्ग 8 टक्के आहे. या तिघांची मिळून 73 टक्के आहे, पण देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या मालकांच्या यादीत 73 टक्के असलेले किती लोक आहेत? 73 टक्के लोकसंख्या ना सैन्यात आहे, ना उच्च न्यायालयात, ना सार्वजनिक क्षेत्रात. या 73 टक्के लोकसंख्येपैकी बहुतांश लोक बेरोजगार आहेत. ज्यांना रोजगार मिळतो, ते कंत्राटी कामगार आहेत. या लोकसंख्येचा वरिष्ठ नोकरशाहीत कोणताही सहभाग नाही, अशीही टीका त्यांनी यावेळी केली.
'राम मंदिर सोहळ्यात एकही गरीब नव्हता.'
राम मंदिराच्या उद्घाटनावेळी फक्त श्रीमंत लोक दिसले, पण एकही गरीब माणूस दिसला नाही. याचे कारण म्हणजे, हे लोक मजूर म्हणून काम करत होते. जात जनगणना हा देशाचा एक्स-रे आहे. आमचे सरकार येताच आम्ही संपूर्ण देशात जात जनगणना करू. शेतकऱ्यांना एमएसपी देण्याची कायदेशीर हमी आम्ही देऊ. मोदींनी शेतकऱ्यांचा एक रुपयाही माफ केला नाही आणि देशातील 20-25 अब्जाधीशांचे 16 लाख कोटी रुपये माफ केले. आमच्या सरकारमध्ये आम्ही शेतकऱ्यांचे 70 हजार कोटी रुपये माफ केले होते, असेही राहुल यावेळी म्हणाले.