ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - दोन हजारांची नोट चलनातून रद्द करण्याच्या केवळ अफवा आहेत असं स्पष्टीकरण केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिलं आहे. असा प्रकारच्या अफवांवर लक्ष देऊ नका असं ते म्हणाले. बुधवारी राज्यसभेत प्रश्नोत्तरांच्या तासादरम्यान काँग्रेस खासदार मधुसूदन मिस्त्री यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
2 हजारांची नोट चलनातून रद्द करण्याच्या अफवा आहेत, दोन हजारांची नवी नोट चलनातून रद्द करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही असं किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केलं.
सरकार दोन हजारांच्या नोटा चलनातून रद्द करणार असल्याच्या अफवा फिरत आहेत, असे मिस्त्री यांनी म्हटले. त्यावर उत्तर देताना रिजिजू यांनी काही दिवसांत गुजरात आणि पश्चिम बंगालमधून मोठ्याप्रमाणावर बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पण या नोटा ओळखल्या जाऊ शकत नाहीत असं नाही, या नोटा सहजपणे ओळखता येणं शक्य आहे . बनावट नोटांसाठी वापरण्यात आलेला कागद निकृष्ट दर्जाचा आहे. याशिवाय सरकारकडून नव्या नोटांमध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. दोन हजारांची नवी नोट चलनातून रद्द करण्याचा कोणताही विचार नाही असं सांगत रिजिजू यांनी यांसदर्भातील सर्व शक्यता फेटाळून लावल्या.
राज्यसभेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) आतापर्यंत आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये केलेल्या कारवाईत दोन हजार रुपयांच्या 378 नोटा पकडल्या आहेत. याशिवाय, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आतापर्यंत दोन हजार रूपयांच्या 22, 677 नोटा जप्त केल्या आहेत.