ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, १७ - बँकेतून नोटा बदलून मिळण्याच्या रकमेची मर्यादा ४५०० वरून २००० रुपयांवर आली असून , उद्या म्हणजे १८ नोव्हेंबरपासून हा नियम लागू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी दिली. नवी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यापूर्वी प्रत्येक व्यक्तीला बँकेतून ४५०० रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून मिळत होत्या, मात्र आता हीच रक्कम २००० रुपये करण्यात आली आहे. अधिकाधिक लोकांना नोटा बदलता याव्यात हाच यामागचा हेतू असल्याचे अर्थसचिवांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर देशभरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पुरेशी रोख रक्कम हाताशी नसल्याने अनकेंना दैनंदिन व्यवहारात अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच नोव्हेंबर, डिसेंबर हा रग्नसराईचा मुहूर्त असून अनेक कुटुंबानाही नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका बसला. ऐन लग्नाच्या तोंडावर भावी वर-वधूसह त्यांचे कुटुंबिय पैशांसाठी तासनतास बँकेच्या रांगेत उभे राहताना दिसत होते. आता सरकारनेच यावर तोडगा काढला असून ज्यांच्या घरात लग्न समारंभ असेल त्यांना बँकेतून अडीच लाखांपर्यंतची रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी केवायसी अकाऊंट असणं बंधनकारक असून केवळ एका व्यक्तीच्याच खात्यातून ही रक्कम काढता येईल, असेही दास यांनी स्पष्ट केले.
दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेतील अर्थसचिवांच्या घोषणेमुळे शेतक-यांनाही दिलास मिळाला आहे. शेतकऱ्यांना खतं-बियाणं, शेतीसंबंधीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी कर्जाच्या रकमेतून आठवड्याला २५ हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच पीक विम्याचा हफ्ता भरण्याच्या मर्यादेतही १५ दिवसांची वाढ करण्यात आल्याचे दास यांनी नमूद केले.