अवघ्या सहा मीटरचेच ड्रील शिल्लक; सायंकाळपर्यंत सर्वांची सुटका शक्य; एनडीआरएफने दिली महत्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 03:05 PM2023-11-23T15:05:59+5:302023-11-23T15:06:21+5:30
सिलक्यारा टनलमध्ये अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी आता देश-विदेशातील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.
मध्यरात्रीनंतर बिघडलेली ऑगर मशीन दुरुस्त करण्यात आली असून बोगद्यात अडकलेल्या मजुरांचे बचाव कार्य अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. ऑगर मशीनने ड्रील करण्यास काही तासांपूर्वी सुरुवात केली आहे. अशातच आता हे अंतर केवळ ६ मीटर एवढे राहिले असून कोणतीही अडचण आली नाही तर सायंकाळपर्यंत सर्वांना बाहेर काढण्यात यश येईल अशी माहिती एनडीआरएफने दिली आहे.
सिलक्यारा टनलमध्ये अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी आता देश-विदेशातील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. सर्व प्रकारच्या मशीनने ढिगाऱ्यातून मार्ग काढण्याचे सर्व प्रयत्न फसल्यानंतर पॅरलल ड्रील करण्यासाठी ऑगर मशीनचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार ड्रील करत ती माती मागे फेकून देणाऱ्या व तिथे पाईप टाकत जाणाऱ्या मशीनचा वापर सुरु करण्यात आला.
परंतू, सहा सहा मीटरचे नऊ पाईप टाकल्यानंतर दहावा पाईप टाकताना मध्येच तीस एमएमची लोखंडी सळई आड आल्याने ऑगर मशीन बिघडली होती. ती दुरुस्त करण्यासाठी सात जणांच्या टीमला दिल्लीहून हेलिकॉप्टरने आणण्यात आले होते. त्यांनी सकाळी ११ वाजेपर्यंत ही मशीन अलाईन करत दुरुस्त केली व पुन्हा कार्यन्वित केली.
एनडीआरएफचे डीजी अतुल करवाल यांनी लेटेस्ट अपडेट दिली आहे. ऑगर मशीनने पुन्हा काम सुरू केले आहे. आतून प्रत्येकी 6 मीटरचे 2-3 पाईप पाठवण्याचा अंदाज आहे. जर दिवसअखेर आम्हाला कोणताही अडथळा आला नाही तर बचाव कार्य पूर्ण होईल, अशी आशा असल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत ४५ मीटरची पाईपलाईन टाकण्यात आली आहे.