विभाष झा, लोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेचे ऋणी आहोत, कारण त्यामुळेच आपल्याला तळागाळापासून येथपर्यंत येता आले. आपल्या नेतृत्वाखालील एनडीएनेच दलित, वंचितांना सन्मान दिला, असे प्रतिपादन करीत भाजपला राज्यघटना रद्द करायची आहे, या विरोधकांच्या आरोपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार खंडन केले.
बिहारच्या गया आणि पूर्णिया जिल्ह्यांमध्ये निवडणूक सभांना संबोधित करताना मोदी यांनी शाळांपासून सर्वोच्च न्यायालय आणि संसदेपर्यंत संविधान दिन साजरा करणे यांसारख्या केंद्र सरकारच्या उपक्रमांचा उल्लेख केला. भ्रष्टाचाऱ्यांविरुद्धची कारवाई चालूच राहील आणि निर्वासितांचा प्रश्न मार्गी लावणार, असेही ते म्हणाले.
एनडीएचे उमेदवार जीतन राम मांझी यांच्या समर्थनार्थ गया येथील सभेत मोदी म्हणाले, आरजेडी हा बिहारमधील जंगलराजचा चेहरा आहे. कंदीलवाले हे लोक तुम्हाला आधुनिक युगात जाऊ देणार नाहीत. कंदील लावून मोबाइल चार्ज होईल का? आरजेडीने बिहारला दोनच गोष्टी दिल्या, पहिला भ्रष्टाचार आणि दुसरे जंगलराज. काही लोकांनी तुष्टीकरणासाठी राम मंदिराचे निमंत्रण नाकारले. आम्ही शक्तीचे उपासक आहोत. ही शक्ती कोणीही नष्ट करू शकत नाही. घमेंडखोर आघाडीच्या लोकांना भगवान राम यांची अडचण होते, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
‘तृणमूल घुसखोरांना संरक्षण देते, सीएएला विरोध करते’बालूरघाट (प. बंगाल) : तृणमूल काँग्रेस घुसखोरांना संरक्षण देते, परंतु निर्वासितांना नागरिकत्व देणाऱ्या ‘सीएए’ कायद्याला विरोध करते, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी येथील सभेत मंगळवारी केली. विश्व हिंदू परिषदेला (व्हीएचपी) हावडा येथे श्रीरामनवमी मिरवणूक काढण्याची परवानगी दिल्याबद्दल कोलकाता उच्च न्यायालयाच्या निकालाला त्यांनी सत्याचा विजय म्हटले. संदेशखाली येथे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला, असेही ते म्हणाले.