ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाली असून निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सत्तेच्या या लढाईला अवघे काहीच दिवस उरले असून त्याच पार्श्वभूमीवर घेण्याता आलेल्या भारतय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेत्यांना इशारा दिला. 'ज्याची लायकी असेल त्याला (निवडणुकीसाठी) तिकीट मिळेल, त्यामुळे आपल्या परिवारातील लोकांना तिकीट मिळावे यासाठी दबाव टाकू नये' असा स्पष्ट इशारा मोदींनी दिला.
नवी दिल्ली येथे आज भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक पार पडली. यावेळी मोदींनी आगामी निवडणुकातील रणनिती तसेच नोटांबदीबद्दलही भाष्य केले.
नोटाबंदी हे भ्रष्टाचार आणि काळा पैसा मिटवण्यासाठी उचलेले ऐतिहासिक पाऊल आहे, असे पंतप्रधान म्हणाल्याची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. ' काही दिवसासांठी त्रास झाला असला तरी तो सहन करून देशाच्या जनतेने नोटाबंदीसारखा मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय स्वीकारला. या दोन महिन्यांच्या काळात भारतीय समाजाची शक्ती दिसली' असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. ' गरीब आणि गरीबी म्हणजे आमच्यासाठी मतपेट्या नसून गरीबांची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा मानतो. आमच्या सरकारचा हाच संकल्प आहे' असे मोदींनी नमूद केले. तसेच ' काही जणांना त्यांच्या लाईफ स्टाईलची चिंता असते पण गरीबांना चांगले, दर्जेदार आयुष्य द्यायचे आहे' असेही मोदींनी सांगितल्याचे प्रसाद यांनी नमूद केले.