सूरत, दि. 8 - रक्षा बंधन हा बहिण-भावाच्या नात्याचा बंध अधिक दृढ करणारा दिवस. पण गुजरात राज्यसभा निवडणुकीमुळे सोमवारी काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांना रक्षाबंधनाच्या सणाला मुकावे लागले. फक्त दोन आमदारांना हा सण साजरा करता आला. सानखेडा येथील काँग्रेसचे आमदार धीरु भील आणि काडीचे आमदार रमेश चावडा यांच्या बहिणींनी नीजानंद रिसॉर्टवर येऊन आपल्या भावांना राखी बांधली.
इतर काँग्रेस आमदारांना त्यांच्या बहिणींनी पाठवलेल्या राख्या रिसॉर्टवरच मिळाल्या. गुजरात राज्यसभा निवडणुकीत मतांची फाटाफूट टाळण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या 44 आमदारांना बंगळुरुतल्या रिसॉर्टवर ठेवण्यात आले होते. हे सर्व आमदार सोमवारी गुजरातमध्ये परतले. त्यांना आनंद जिल्ह्यातील रिसॉर्टवर ठेवण्यात आले होते. धीरु भील यांची बहिण रेणुका(55) नासवाडी येथून आली होती.
आमदारांशी कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीने संपर्क करु नये म्हणून काँग्रेसने प्रचंड खबरदारी घेतली होती. प्रवेशव्दारावर काँग्रेस कार्यकर्त्यांचा खडा पहारा होता. नातेवाईकांची ओळख पटेपर्यंत त्यांना प्रवेशव्दारावर थांबवून ठेवण्यात आले होते. रेणूका यांना जवळपास तासभर प्लास्टिकच्या खुर्चीवर बसवून ठेवण्यात आले होते. भावाला ओवाळण्यासाठी राखी आणि मिठाईचा डब्बा त्यांनी सोबत आणला होता. बरीच फोनाफोनी झाल्यानंतर त्यांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर त्यांना रिसॉर्टमध्ये प्रवेश देण्यात आला.
मी आतापर्यंत एकदाही रक्षाबंधनाचा सण चुकवलेला नाही. यावर्षी माझा भाऊ दुस-या शहरात होता. त्यामुळे त्याला भेटता येणार नाही असे मला वाटत होते. पण रविवारी संध्याकाळी त्याने मला फोन केला आणि इथे येण्याची व्यवस्था करतो असे सांगितले. त्यामुळे मला यंदाचे रक्षाबंधन साजरे करता आले. चावडा यांच्या बहिणीसोबत त्यांची मुले सुद्धा गेली होती. चावडा यांच्या बहिणीने काहीही बोलण्यास नकार दिला. भेट खासगी होती त्यामुळे आपण काही बोलणार नाही असे त्यांच्या बहिणीने सांगितले.