नवी दिल्ली : सहारा उद्योग समूहातील दोन कंपन्यांची गुंतवणूकदारांना देणे असलेली रक्कम वसूल करण्यासाठी, ‘सहारा’च्या मालकीच्या पुणे जिल्ह्यातील ‘अॅम्बी व्हॅली’च्या लिलावासाठी फक्त दोन खरेदीदारांनी स्वारस्य दाखविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या आॅफिशियल लिक्विडेटर कार्यालयाने या लिलावासाठी इच्छुकांकडून बोली मागविणारी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात इच्छुक निविदादारांनी केवायसी निकषांची पूर्तता करण्याची अट होती. त्यानुसार, फक्त दोन इच्छुकांनी त्यांचा केवायसी तपशील सादर केला असल्याचे या सूत्रांनी सांगितले. या लिलावासाठी ‘अॅम्बी व्हॅली’ची राखीव किंमत ३७,३९२ कोटी रुपये ठरविण्यात आली आहे. या मालमत्तेची व्याप्ती व मूल्य पाहता, ती खरेदी करणे कोणा एकट्याच्या आवाक्यातील काम नव्हे, असे रियल इस्टेट उद्योगातील जाणकारांना वाटते.
सहारा समूहाच्या अॅम्बी व्हॅलीच्या लिलावासाठी फक्त दोनच निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 1:35 AM