गुवाहाटी : व्हीआयपी संस्कृती आसाम सरकार संपुष्टात आणणार आहे. यापुढे सरकारी कार्यक्रमात केवळ शाकाहारी व सात्विक खाद्यपदार्थच दिले जातील, असे त्या राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोमवारी जाहीर केले. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत.
त्यांनी सांगितले की, एखाद्या जिल्ह्यात मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांचा दौरा असेल तिथे सरकारी कार्यक्रमात फक्त शाकाहारी खाद्यपदार्थच दिले जातील. हे कार्यक्रमदेखील साध्या पद्धतीने आयोजित करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
‘सरकारी इमारतींच्या बांधकामावर लक्ष ठेवा’
सरमा म्हणाले की, जिल्ह्यातील सरकारी इमारतींचे बांधकाम किती पूर्ण झाले, याची पाहणी करावी. आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी केंद्र या गोष्टींतून विकासाला चालना मिळते. त्यामुळे त्या गोष्टींकडेही जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.
नियमातून पाहुण्यांना वगळले
सरकारी कार्यक्रमात शाकाहारी खाद्यपदार्थ किंवा जेवण देणे यापुढे बंधनकारक करण्यात येणार आहे. मात्र सरकारने कार्यक्रम, दौऱ्यासाठी आमंत्रित केलेल्या पाहुण्यांना मात्र हा नियम लागू होणार नाही असे बिस्वा सरमा यांनी सांगितले. आसाम सरकारने विकासावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे.
ताफ्यामध्ये दहापेक्षा जास्त कार नकोत...
मुख्यमंत्र्यांचा एखाद्या जिल्ह्यात दौरा असेल त्यावेळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्या कारसह ताफ्यामध्ये दहापेक्षा जास्त कार नसाव्यात, असा आदेश हिमंता बिस्वा सरमा यांनी दिला. गेल्या महिन्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित असलेल्या मंत्र्यांसाठी एका जिल्हाधिकाऱ्याने शाही भोजनव्यवस्था केली होती. त्यामुळे या अधिकाऱ्याला मुख्यमंत्री सरमा यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर या जिल्हाधिकाऱ्याला एक पत्र लिहून सरमा यांनी त्यांचे कान टोचले. बैठकीत शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्याच्या वारंवार सूचना देऊनही त्याचे पालन करण्यात आले नाही, असे त्यांनी या पत्रात म्हटले होते.